नैसर्गिक पाणी प्रवाह क्षेत्रातील अतिक्रमण पालिकेने हटवले

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण नगरपालिका हद्दीतील रेवतळे सागरी महामार्ग येथे नैसर्गिक पाणीप्रवाह क्षेत्रात अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम अखेर पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने हटवून पाणी प्रवाह सुरळीत केला.

दरम्यान ज्या व्यक्तीने हे बांधकाम केले होते. त्याला समज देत पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अतिक्रमण न हटवल्यामुळे पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवण्यात आल्याने संबंधितांकडून खर्च वसूल केला जाणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

गतवर्षी शहरातील देऊळवाडा भागात मुसळधार पावसात पाणी तुंबले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यावेळीही याच परिसरात अश्याच पद्धतीने पाणी प्रवाह अडवण्यात आला होता. त्यावेळी तो अडथळा दूर करण्यात आला. आता नव्याने अनधिकृतरित्या बेकायदेशीरपणे पाणी प्रवाह क्षेत्रात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम झाले. मोठमोठे पाईप टाकून मार्ग तयार करण्यात आला होता.

या प्रकारामुळे पावसाळा कालावधीत लगतच्या परिसरात गतवर्षी प्रमाणे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणीप्रवाह जाण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पालिकेच्या वतीने कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले.