भावा, चुकलास! स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले

मैदानावर खेळताना विविध प्रकारच्या चेंडूंचा सामना करावा लागतो. बाऊन्सर चेंडू हा खेळाचाच एक भाग आहे. पण ज्यावेळी आपण टाकलेला बाऊन्सर फलंदाजाच्या डोक्यावर आदळतो आणि फलंदाज मैदानावरच कोसळतो, तेव्हा फलंदाजाकडे धावत जाऊन त्याची खुशाली पाहणे हे गोलंदाजाचे कर्तव्य आहे. जेव्हा तू टाकलेला चेंडू जोरात स्मिथच्या मानेवर आदळला आणि स्मिथ कळवळत होता, तेव्हा स्मिथजवळ न जाता तू तसाच तिथून निघून गेला, हे खूप चुकीचे आहे. ‘भावा, चुकलास’, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सुनावले. माझ्या चेंडूवर एखादा फलंदाज जखमी झाला तर मी सर्वप्रथम त्या फलंदाजाकडे धावत जायचो, अशा शब्दात अख्तरने आपला संताप व्यक्त केला.

…अन् 12व्या खेळाडूने केली फलंदाजी

इंग्लंडविरुद्धची दुसरी अ‍ॅशेस कसोटी ऑस्ट्रेलियाने वाचवली. स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने 80 धावांची खेळी केली. त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली. तिसऱ्या कसोटीत तो खेळू शकेल की नाही याबाबतही साशंकता आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने जोफ्रा आर्चरला सुनावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या