सोलापूर झेडपीचे कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकाऱयांची अखेर बदली

सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी आणि शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. कोळी यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संभाजीनगरला करण्यात आली असून, बाबर यांची बदली पुण्याला करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सोलापूर जिह्याला हजारो कोटींचा निधी मिळाला. या कामांच्या टेंडरमध्ये कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी अनियमितपणा केल्याच्या तक्रारी आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या होत्या. त्याकरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोळी यांची चौकशी लावली होती. त्या चौकशीच्या अहवालात जनजीवन मिशन योजनेच्या कामात टेंडर देताना अनियमितपणा आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे पाठवला होता. त्यामुळे एक महिन्याच्या आतच शासनाने कोळी यांची बदली केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दीपक कोळी यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. जलजीवन मिशनचे टेंडर देताना त्यांनी गोंधळ घातला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हेसुद्धा त्यांच्या कारभारावर काही दिवसांत प्रचंड नाराज दिसून आले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्याविरोधात वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. दीड महिना रजेवर गेल्यानंतर पदभार उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे देण्यात आला होता. काही आमदारांनी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली होती. कारवाईची शक्यता असतानाच रजेवरून येत त्यांनी पदभार घेतला होता. अखेर त्यांची बदली पुण्यातील राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद येथे झाली आहे.