हिंगोलीत विद्युत रोहित्रासाठी अभियंत्याचे अपहरण

45

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांचे वसमतच्या काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष तुषार जाधव यांनी तीन साथीदारासह अपहरण केल्याची घटना घडली. पोलिसांनी अपहरणकर्ताच्या तावाडीतून बेरसले यांची सुटका केली. विशेष म्हणजे विद्युत रोहित्रासाठी बेरसले यांचे अपहरण करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीजवळील लिंबाळा एमआयडीसी भागात वीज महावितरणचे विद्युत रोहित्र दुरुस्त केले जातात. शुक्रवारी (२३ मार्च) सायंकाळी ६ वाजता वसमत येथील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तुषार जाधव हे याठिकाणी आले व सहायक अभियंता सचिन बेरसले यांना भेटले. जाधव यांनी बेरसले यांना कळलावी शिवारातील विद्युत रोहित्र का दिले नाही, असा प्रश्न केला. त्यावेळी बेरसले यांनी सध्या रोहित्र उपलब्ध नाही, उपलब्ध झाल्यावर देऊ असे उत्तर दिले. तुषार जाधव व त्यांच्या सोबतच्या तीन साथीदारानी अभियंता बेरसले यांना टाटा सफारी वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून वसमत तालुक्यातील म्हातरगांव येथे नेले. घटनेची माहिती समजताच वसमत येथील पोलीस उपअधीक्षक शशिकिरण काशिद यांनी कर्मचाऱ्यांसह म्हातरगांव येथे जावून बेरसले यांची सुटका केली. दरम्यान, आज बेरसले यांच्या फिर्यादीवरुन तुषार जाधव व इतर तिघांविरुध्द अपहरण व शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या