बेन स्टोक्सच्या घरात चोरी, जिवापाड जपलेल्या वस्तू चोरीला गेल्याने झाला भावूक

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. चेहऱ्यावर मास्क घालून चोरटे त्याच्या घरात शिरले. त्यावेळी त्याचे कुटुंबीय घरातच होते. तर बेन स्टोक्स पाकिस्तानमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करत होता. चोरांनी कुटुंबीयांना शारिरीक नुकसान पोहोचवले नसले तरी जिवापाड जपलेल्या अनेक मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे त्याने सांगितले.

बेन स्टोक्सने चोरी केलेल्या काही वस्तूंचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये 2020 चे ओबीई मेडल, तीन चेन, अंगठी आणि एक डिझायनर बॅगेचा समावेश आहे. सोशल मीडियावर त्याने माहिती दिली. गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चेहऱ्यावर मास्क घातलेल्या काही चोरांनी घरात घुसून उत्तर पूर्वमधील केसल ईडन परिसरातील माझ्या घरी चोरी केली.

दागिने, किमती वस्तू आणि बरेच खासगी सामान घेऊन चोर पळाले आहेत. त्यातले बरेचसे सामान जिवापाड जपलेले होते. ‘ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना शोधण्यासाठी, कोणत्याही मदतीसाठी हे आवाहन आहे. या गुन्ह्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माझी पत्नी आणि 2 लहान मुले घरी असताना हा गुन्हा घडला, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुदैवाने माझ्या घरातील कोणाचेही शारिरीक नुकसान झालेले नाही. मात्र या घटनेने त्यांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम झाला आहे. ‘आम्ही फक्त कल्पना करू शकतो की ही परिस्थिती किती भयानक असू शकते. मी चोरी झालेल्या काही वस्तूंची छायाचित्रे प्रसिद्ध करत आहे – ज्यांना सहज ओळखता येईल. या आशेने त्या चोरट्यांना शोधू शकू, असेही बेन स्टोक्स म्हणाला.