दुबळ्य़ा न्यूझीलंडसमोर इंग्लंडचे तगडे आव्हान

34

सामना ऑनलाईन । मुंबई

फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपला अवघे काही दिवस उरले असताना मुंबईत सराव लढतींची रणधुमाळी रंगली आहे. ब्राझील आणि न्यूझीलंड यांच्यामधील पहिल्या सराव लढतीला दणदणीत प्रतिसाद लाभल्यानंतर आता उद्या रविवारी अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल पुन्हा दोन तगड्य़ा संघांतील फुटबॉल सराव लढतीने गजबजणार आहे. इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यामधील लढत विनामूल्य असल्याने मुंबईकर क्रीडाशौकिनांसाठी उद्याचा दिवस सुपर संडे ठरणार आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड या लढतीत विजयाचा दावेदार असला तरी न्यूझीलंड संघही तेवढय़ाच ताकदीने मैदानात झुंज देणार असल्याचा विश्वास न्यूझीलंडचे प्रशिक्षक डॅनी हे यांनी व्यक्त केला.

मुंबईतील फुटबॉलच्या हायटेक सुविधा आणि प्रवास निवासाची उत्तम सोय यामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंड व ब्राझील या टॉपच्या संघाने मुंबईची स्वतःच्या पाहुणचारासाठी निवड केली असल्याचे मत इंग्लंडचे प्रशिक्षक स्टीव्ह कूपर यांनी लढतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. कूपर म्हणाले, मुंबई फुटबॉल अरिनात सरावासाठी आम्हाला उच्च दर्जाच्या सुविधा लाभल्या आहेत. याचे श्रेय मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे (एमडीएफए) अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनिझिस यांनाच द्यावे लागेल. सराव लढतीतील अनुभव आम्हाला मुख्य स्पर्धेतील लढतीत खेळताना लाभदायकच ठरणार आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. मुंबई फुटबॉल अरिनाचे विश्वस्त दिनेश नायर यांनी स्वतः उपस्थित राहून पाहुण्या संघाची चोख व्यवस्था ठेवली आहे त्याबद्दल दोन्ही संघांनी समाधान व्यक्त केले.

क्लब संस्कृतीने उंचावला इंग्लिश फुटबॉलचा दर्जा – कूपर
इंग्लंडमध्ये शालेय स्तरापासून फुटबॉल खेळले जातेच शिवाय तेथील विविध कौंटीत नामांकित फुटबॉल क्लबची संख्या लक्षणीय आहे. या क्लबमधील प्रशिक्षणामुळेच युवा फुटबॉलपटूमधील टॅलेंट सतत वाढते आहे. त्यामुळेच इंग्लंडने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे, असे प्रतिपादन इंग्लंड संघाचे प्रशिक्षक स्टीव कूपर यांनी केले. हिंदुस्थानातही क्लब संख्या वाढल्यास फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा संख्येने होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या