इंग्लंडची दमदार सुरुवात

62

 

चेन्नई, (वृत्तसंस्था)

पाहुण्या इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद २८४ धावसंख्येपर्यंत मजल मारून दमदार सुरुवात केली. जो रूटचे आकर्षक अर्धशतक आणि मोईन अलीची झुंजार नाबाद शतकी खेळी ही इंग्लंडच्या फलंदाजीची पहिल्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मोईन अली १२० तर बेन स्टोक्स ५ धावांवर खेळत होता.

सलामीच्या जोडीचा फ्लॉप शो
नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इशांत शर्माने एका अप्रतिम चेंडूवर किटॉन जेनिंग्सला (१) यष्टीमागे पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सहाव्या षटकात पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक हा रवींद्र जाडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात सापडला. १० धावांवर त्याने पहिल्या स्लिपमध्ये कोहलीकडे झेल दिला. धावफलकावर अवघ्या २१ धावा असताना इंग्लंडची सलामीची जोडी १२.४ षटकांतच तंबूत परतली.

राफेलच्या जागेवर सायमन पंच
मुंबईतील चौथ्या कसोटीदरम्यान भुवनेश्‍वर कुमारचा थ्रो डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन पंच पॉल राफेल जायबंदी झाले. त्यांच्या जागेवर पाचव्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचेच सायमन फ्राइ हे पंच म्हणून मैदानावर उरतले. चेन्नई कसोटीतही पॉल राफेलच पंच राहणार होते. मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने सायमन फ्राइ यांनी त्यांची जागा घेतली.

उभय संघांत दोन-दोन बदल

मुंबई कसोटीत अष्टपैलू कामगिरीसह शतक ठोकणारा जयंत यादवच्या जागेवर चेन्नई कसोटीसाठी लेगब्रेक स्पिनर अमित मिश्राला तर वेगवात गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या ऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आली. इंग्लंड संघातही दोन बदल करण्यात आले. जायबंदी जेम्स अ‍ॅण्डरसन व ख्रिस वोक्स यांच्याऐवजी अनुक्रमे स्टुअर्ट ब्रॉड व लायन डाऊसनला संधी दिली आहे. डाऊसनचे हे कसोटी पदार्पण होय.

अली-रूटची झुंजार फलंदाजी

सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतरही फॉर्ममध्ये असलेला जो रूट (८८) व मोईन अली (१२०) यांनी झुंजार फलंदाजी करत इंग्लंडच्या डाव सावरला. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी १४६ धावांची भागीदारी केली. अली-रूट जोडीच्या चिवट प्रतिकारापुढे रविचंद्रन अश्‍विन आणि अमित मिश्रा या फिरकी जोडगोळीची चांगलीच दमछाक झाली. मात्र रवींद्र जाडेजा एका बाजूने टिच्चून मारा करत होता. त्यानेच रूटला यष्टीमागे पार्थिवकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. रूटने १४४ चेंडूंच्या संयमी खेळीत ८८ धावा करताना १० चौकार लगावले. रूटच्या जागेवर आलेल्या जॉनी बैयरस्टोचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. ९० चेंडूंत तीन षटकारांसह ४९ धावा करणार्‍या बैयरस्टोला जाडेजाने लोकेश राहुलकरवी झेलबाद करून इंग्लंडला चौथा हादरा दिला. जाडेजाने ७३ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज बाद केले तर इशांत शर्माला एक बळी मिळाला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड: अ‍ॅलिस्टर कूक झे. कोहली गो. जाडेजा १०, किटॉन जेनिंग्स झे. पार्थिव गो. इशांत १, जो रूट झे. पार्थिव गो. जाडेजा ८८, मोईन अली खेळत आहे १२०, जॉनी बैयरस्टो झे. लोकेश गो. जाडेजा ४९, बेन स्टोक्स खेळत आहे ५. अवांतर : ११, एकूण: ९० षटकांत ४ बाद २८४ धावा. बाद क्रम : १-७, २-२१, ३-१६७, ४-२५३. गोलंदाजी : उमेश यादव १२-१-४४-०, ईशांत शर्मा १२-५-२५-१, रवींद्र जाडेजा २८-३-७३-३, रविचंद्रन अश्‍विन २४-१-७६-०, अमित मिश्रा १३-१-५२-०.

आपली प्रतिक्रिया द्या