सामना पाहिला आणि वाट लागली! फुटबॉलचा सामना बघितल्याने तरुणीला नोकरीवरून काढून टाकलं

इंग्लंडच्या फुटबॉल संघाने 1966 साली वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली होती. त्यानंतर मात्र इंग्लंडच्या संघाला वर्ल्ड कप आणि युरो फुटबॉल चॅम्पियनशिप या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या जेतेपदापासून दूरच रहावे लागले. तब्बल 55 वर्षांनंतर गॅरेथ साउथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली व हॅरी केन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत डेन्मार्कला 2-1 अशा फरकाने पराभूत केले आणि युरो फुटबॉल चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. येत्या रविवारी होणाऱया जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडसमोर इटलीचे आव्हान असणार आहे. हा सामना जिंकल्याने इंग्लंडच्या संघाचे पाठीराखे बेहद्द खूश आहेत. मात्र एक तरुणी अशी आहे जी या संघाची कट्टर पाठीराखण करणारी असूनही ती नाखूश आहे. कारण हा सामना बघितल्याने तिला तिच्या वरिष्ठाने नोकरीवरून काढून टाकलं आहे.

नीना फारूखी (37 वर्षे) असं या तरुणीचं नाव आहे. यॉर्कशायर भागात कामाला जाणाऱ्या नीनाने सामन्यासाठी सुट्टी घेण्याचा विचार केला होता, मात्र कोरोनामुळे कार्यालयात माणसं कमी असल्याने सुट्टी मिळणार नाही असं तिला वाटत होतं. यामुळे नीनाने आपल्याला बरं वाटत नसून आज आपण सुट्टी घेत असल्याचं तिच्या बॉसला कळवलं होतं. यानंतर तिने तिच्या मैत्रिणीसोबत थेट वेंबलीच्या मैदानाची वाट धरली. नीना ही गोलपोस्टच्या बरोबर मागच्या बाजूला बसली होती. ती वृत्तनिवेदक असलेल्या स्टेसी डुलीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येही झळकली होती. डुलीच्या पोस्टमध्ये झळकल्याने तिला भयंकर आनंद झाला होता, या आनंदात तिने त्याची पोस्टही शेअर केली होती.

इंग्लंडने सामन्यात गोलची बरोबरी साधली असता नीना आणि तिची मैत्रीण आनंदाने बेभान झाल्या होत्या. त्या करत असलेला जल्लोष मैदानातील कॅमेऱ्यांनी व्यवस्थितपणे टीपला होता. अवघ्या काही सेकंदात नीनाचा चेहरा जगभरात पोहोचला होता. सामना संपवून नीना घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ऑफिसला जायला निघाली. यावेळी तिच्या बॉसने फोन केला आणि ऑफिसला येण्याचे यापुढे कष्ट घेऊ नयेत असं स्पष्ट शब्दात सांगितलं आणि फोन ठेवून दिला. नीनाने द डेली टेलिग्राफशी बोलताना म्हटले की कोणालाही नोकरीवरून काढून टाकल्यास त्याला वाईट वाटेल, तसं मलाही वाटतं आहे. सामन्याला गेलो तर 60 हजार लोकांमध्ये आपण कुठे दिसणार आहोत, असा विचार करून मी सामन्याला गेले होते असं नीनाने सांगितलंय. मात्र नीनाचं दुर्देव असं की 60 हजार लोकांमध्ये तीच ठळकपणे दिसली आणि ती सामन्यासाठी मैदानात गेली असल्याचं तिच्या बॉसनेही पाहिलं होतं.

या सामन्यात इंग्लंडच्या या विजयाला गालबोट लागले. वेम्बली स्टेडियममध्ये उपस्थित फुटबॉलप्रेमींकडून डेन्मार्कचा गोलकिपर कॅस्पर श्मायकल याच्या डोळ्यांवर लेझर लाईट मारण्यात आल्याचे समोर आले आहे. हॅरी केन पेनल्टी कीक मारत होता त्या वेळी हा प्रसंग घडला. तसेच लढत सुरू होण्यापूर्वी डेन्मार्कचे राष्ट्रगीत सुरू असतानाही प्रेक्षकांकडून गैरवर्तन करण्यात आले. या सर्व प्रकरणाची युएफाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

25 यार्डवरून भन्नाट फ्री कीक

डेन्मार्कने 30व्या मिनिटाला 1-0 अशी आघाडी घेत इंग्लंडला धक्का दिला. मिकेल डॅम्सगार्ड याने 25 यार्डवरून मारलेल्या फ्री कीकवर डेन्मार्कचा गोल झाला. मिकेल डॅम्सगार्ड याने मारलेल्या या कीकने इंग्लंड संघातील खेळाडू तसेच गोलकिपरचा बचाव भेदला. जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा गोल ठरला.

‘ओन गोल’मुळे इंग्लंडची बरोबरी

इंग्लंडच्या संघाने 39व्या मिनिटाला या लढतीत 1-1 अशी बरोबरी साधली. हॅरी केनचा उत्कृष्ट पास व रहीम स्टर्लिंगची चपळाई याच्या जोरावर हा गोल झाला. मात्र डेन्मार्कचा सिमोन जेअर याच्या अंगाला स्पर्श करून फुटबॉल गोलजाळ्यात गेल्यामुळे हा ‘ओन गोल’ ठरला.

पेनल्टीच्या निर्णयावर टीका

इंग्लंड-डेन्मार्क यांच्यात निर्धारीत वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली. त्यामुळे निकालासाठी एक्स्ट्रा टाईममध्ये खेळ पोहोचला. जोकीम मेहले याच्याकडून ‘बॉक्स’मध्ये चूक घडली. त्यामुळे इंग्लंडचा फॉरवर्ड रहीम स्टर्लिंग पडला. यानंतर रेफ्रींकडून इंग्लंडला पेनल्टी देण्यात आली. डेन्मार्ककडून ‘वीएआर’ (रिह्यू) मागण्यात आला. पण तिथेही पेनल्टीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. पण जी घटना घडली ती पेनल्टी देण्याइतपत झालेली नव्हती. त्यामुळे पेनल्टीच्या या निर्णयावर टीका करण्यात येऊ लागली. हॅरी केनने डेन्मार्कचा गोलकिपर कॅस्पर श्मायकलचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. त्याची कीक पॅस्पर श्मायकल याने परतवून लावली. पण त्याच्या हातामधून फुटबॉल सुटला. त्यानंतर रिबाऊंडमध्ये हॅरी केनने गोल करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आपली प्रतिक्रिया द्या