आवेशनंतर सुंदरलाही दुखापत, बीसीसीआय करतेय पर्यायी खेळाडू पाठवण्याचा विचार

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण त्याआधी विराट कोहलीच्या ब्रिगेडला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान याच्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आता दुखापतग्रस्त खेळाडूंऐवजी कोणत्या खेळाडूंना इंग्लंडला पाठवायचे याबाबत बीसीसीआय विचार करीत आहे.

शुभमन गील, आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर यांच्या दुखापतीमुळे आता हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. हिंदुस्थानचा दुसरा संघ श्रीलंकेत झटपट मालिका खेळत आहे. आता या संघामधून काही खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. पण बीसीसीआयकडून अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

पृथ्वी,भुवीला संधी

मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉ व मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार या दोन खेळाडूंना इंग्लंड दौऱयासाठी टीम इंडियाचे तिकीट मिळू शकते. सलामीवीर शुभमन गील दुखापतीमुळे इंग्लंड दौऱयातून बाहेर आला आहे. तसेच दुखापतीमुळे दौऱयामधून माघार घेणारा आवेश खानही वेगवान गोलंदाज आहे. पृथ्वी शॉच्या बॅटमधून गेल्या काही काळात धावांचा पाऊस पडलाय. तसेच इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना पोषक असलेल्या वातावरणात भुवनेश्वर कुमार फायदेशीर ठरू शकतो. यामुळे या दोघांची निवड झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

श्रीलंका ‘रेड लिस्ट’मध्ये

शिखर धवनच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा दुसरा संघ श्रीलंकेशी दोन हात करीत आहे. या संघांमधील काही खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्यात येऊ शकते. पण युकेमध्ये श्रीलंकेमधून येणाऱया व्यक्तींना रेड सिग्नल दाखवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय आता कोणते पाऊल उचलतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या