इंग्लंडची “हॅटट्रीक”, तिन्ही खेळांचा वर्ल्डकप जिंकणारा ठरला पहिला देश

69

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेला 2019 विश्वचषक स्पर्धेचा रविवारचा रोमहर्षक अंतिम सामना क्रिकेटशौकिनांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. सामना टाय होईल आणि निकाल सुपरओव्हरमध्ये लागेल याची कुणालाही साधी कल्पनाही नव्हती. सुपरओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला. पण सर्वाधिक चौकारांच्या बळावर यजमान इंग्लंडने विजय मिळवत पहिल्या विश्वचषक जेतेपदाला गवसणी घातली.या विजयासह इंग्लंड क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बीचे विजेतेपद मिळवणारा पहिला देश ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रात महत्वाच्या स्पर्धांमध्ये इंग्लंडला पहिले यश 1966 साली मिळाले. त्यावेळी इंग्लंडने पश्चिम जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदा फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला होता. 2003 साली इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा 20-17 असा पराभव करुन पहिल्यांदा रग्बी वर्ल्डकप जिंकला. 1966 सालच्या फुटबॉल वर्ल्डकपनंतर इंग्लंडने जिंकलेले ते दुसरे विश्वविजेतेपद होते.

क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने 24 तर न्यूझीलंडने 17 चौकार मारले होते. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले. रविवारच्या जेतेपदप्राप्तीमुळे विश्वविजेतेपदाची “हॅटट्रीक” इंग्लंडने साधली. विशेष म्हणजे इंग्लंडने तीन वेगवेगळ्या खेळांत विश्वचॅम्पिअन होणारा जगातील पहिलाच देश बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या