रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थान पराभूत, इंग्लंडने जिंकला विश्वचषक

सामना ऑनलाईन । लंडन

लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने हिंदुस्थानचा ९ धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा संपूर्ण संघ २१९ धावाच करू शकला. हिंदुस्थानच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत जिगरी खेळ करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐन वेळेस विकेट्स गमावल्याने विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नांना धक्का बसला. पराभवानंतर हिंदुस्थानच्या अनेक खेळाडूंना भावना आवरता आल्या नाहीत. इंग्लंडने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले..

मितालीचा विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हुकला

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्य २२९ धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन सामन्यात चमकलेली मात्र नंतर फॉर्म हरवलेली स्म्रिती मंधाना शुन्यावर बाद झाली. त्यानंतर आलेल्या कर्णधार मिताली राजने सलामीवीर पूनम राऊत सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र १७ धावा करून ती बाद झाली. मिताली बाद झाल्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौर आणि पूनम राऊतने चांगली भागिदारी करत हिंदुस्थानला विजयाचा मार्ग दाखवला, मात्र हरमनप्रीत कौर अर्धशतक करून बाद झाली, तिने ५१ धावा केल्या. पूनम राऊतने एकाकी झुंज देत ८६ धावा केल्या. पूनम बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने हिंदुस्थानने विकेट्स गमावल्याने पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न भंग पावले आहे. इंग्लंडकडून अॅना शर्बसोलने ६ बळी घेत हिंदुस्थानच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले, अॅलेक्स हार्टलेने २ बळी घेत तिला उत्तम साथ दिली.

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानसमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २२८ धावा केल्या. इंग्लंडकडून स्काईव्हरने सर्वधिक ५१, तर सारा टेलरने ४५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या काही षटकांत गन आणि मार्शने धावगतीला वेग दिल्याने इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने १० षटकांत २३ धावा देत ३ बळी मिळवले, तर फिरकी गोलंदाज पूनम यादवने २ आणि गायकवाडने एक बळी मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या