कस्तुरबांची गोष्ट इंग्रजी रंगभूमीवर

31

‘जगदंबा’ या एकपात्री प्रयोगातून कस्तुरबांचा जीवनपट उलगडला जातो. हे मराठी नाटक इंग्रजी रंगभूमीवर सादर होत आहे.

महात्मा  गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा एक सामान्य स्त्री होत्या, पण त्यांच्या सहवासात त्यांना असामान्यत्व प्राप्त झाले… कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘जगदंबा’ हे मूळ मराठी नाटक आता इतर भाषिक प्रेक्षकांसाठी इंग्रजी भाषेत प्रायोगिक रंगभूमीवर सादर होत आहे. आविष्कार या नाट्यसंस्थेतर्फे या दोन अंकी एकपात्री नाटकाचा इंग्रजी अनुवाद ज्येष्ठ अभिनेत्री यशोधरा देशपांडे-मैत्र यांनी केला आहे.

गांधीजींवर संशोधन करणाऱ्या रामदास भटकळ यांच्या लेखनातून हे नाटक आकाराला आलं. कस्तुरबा गांधी यांच्या परिवर्तनाची अद्भूत कहाणी प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळेल. विशेष म्हणजे नाटकाच्या अनुवादिका यशोधरा देशपांडे-मैत्र या कस्तुरबाच्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. संजय मग्गीरवार यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

‘जगदंबा’ विषयी रामदास भटकळ सांगतात, माझा ‘गांधी’ या विषयाचा अभ्यास होता; परंतु कस्तुरबावर माझा अभ्यास नव्हता त्यामुळे माझ्यासाठी हे एक आव्हानच होते. लिखाण करताना कळत-नकळत या नाटकाचा एक वेगळाच फॉम तयार झाल्याचं माझ्या लक्षात आलं. कस्तुरबा गांधींनी जे प्रसंग पाहिले आहेत तेच लिहिण्याचा माझा निश्चय होता. जे प्रसंग कस्तुरबाने पाहिले नाहीत त्याचं कल्पनाचित्र मला मांडायचं नव्हतं. त्यानुसार कस्तुरबाने पाहिलेलं गांधींचं जीवन मांडायचं, हे सूत्र मी पाळलं आहे.’ नाटकाचं लेखन एकपात्री असलं तरी तांत्रिकदृष्टया हे नाटक एकपात्री नाही. नाटकात तीन पात्र असून, कलाकार दोनच आहेत.

निरक्षर, परंपरागत संस्कृतीत वाढलेल्या कस्तुरबा यांचा विवाह अवघ्या 13व्या वर्षी झाला. तेव्हा तिच्या अपेक्षांपेक्षा वेगळ्याच परिस्थितीशी तिला जुळवून घ्यावे लागते. गांधीजींनी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले. त्या काळातील स्त्र्ायांच्या मानाने ही अतिशय धक्कादायक बाब होती, मात्र ही परिस्थितीच त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत बनते. अशी ‘जगदंबा’ ही नाटय़ाकृती असून ती जरी कस्तुरबा आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असली तरी त्यामध्ये आई, पत्नी आणि एका स्त्रीची कथा आहे.

नात्यातले रंग शोधायला शिकवणारे…

गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडनला गेले तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी हिंदुस्थानात राहिल्या. ब्रह्मचर्य पालनाचा निर्णय घेतला तेव्हा त्या त्यांना खंबीर साथ देतात. अशा अनेक निर्णयात त्या त्यांच्या बरोबर होत्या. धार्मिक असूनही पतीप्रमाणेच जातीभेदाचा त्याग केला आणि सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबर आश्रमात राहिल्या. मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत 3 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगली. महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात चळवळीचे कार्य सांभाळले, शेतकऱयांच्या पत्नी आणि मुलांना त्यांनी साक्षरतेचे धडे दिले. त्यामुळे हे नाटक नव्या पिढीतील प्रेक्षकांना या दोघांच्या नात्यातील निरनिराळे रंग शोधायला शिकवते.

आपली प्रतिक्रिया द्या