नृत्यातून फिटनेस

अभिनेत्री, नृत्यांगना मीरा जोशी हिची खाद्य आवडनिवड जाणून घेऊ या

कला ही मीराची साधना आहे. त्यामुळेच तिला फिटनेससाठी अधिक काही करावं लागत नाही. नृत्यानेच तिला आजपर्यंत फिट राहण्यात मदत केली आहे, असे ती सांगते.

मीरा खूप छान स्वयंपाक करते. मूड आला तर खूप चविष्ट पावभाजी बनवते. तिच्या हातचे हेल्दी पॅन केक्स तर सगळ्यांचेच फेव्हरेट. एवढं सगळं येत असलं तरी सकाळचा चहा फक्त कोणी बनवून दिला पाहिजे… मीरा हसत सांगते. तिला आईच्या हातचे आलूपराठा, पुरणपोळी खूपच प्रिय आहे. तिची आई साऊथ इंडियन डिशेसही उत्तम बनवते.

एकतर प्रचंड गोड पदार्थ किंवा अगदी तिखट पदार्थ… अधलेमधले काहीच नको. मीराचा हा सरळ फंडा. तिला नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतं. नवीन काहीतरी खाण्यासाठी ती आईसोबत फिरते. एकदा तर नाशिकला जाऊन मिसळ खाऊन आली. काही गोष्टी स्ट्रीटवरच चांगल्या मिळतात. टपरीवरचा चहा आणि वडापाव… फक्कड बेत!

मीरा शाकाहारी आहे. पहिल्यांदा जेव्हा ती मुंबईला आली तेव्हाचा एक किस्सा तिच्या स्मरणात आहे. ती एका डान्स ग्रुपसोबत आली होती. महालक्ष्मी रेसकोर्सला त्यांची स्पर्धा होती. सगळे जण प्रवास करून आलेले. त्यामुळे खूप भूक लागली होती. तिथे त्यांना सँडविच देण्यात आले. भूक लागलेली म्हणून समोर जे आले ते खायला सुरुवात केली. मीराला जाणवलं की, हे काहीतरी वेगळं लागत आहे. नंतर समजलं की, चुकून तिने चिकन सँडविच खाल्ले.

जे तुम्हाला आवडेल ते खा. स्वतःचे मन मारून जगलो तर आनंदी कसे राहणार? प्रत्येकाचा आनंद हा त्यांच्या पोटाशीच असतो, पण डॉक्टरांनी जर काही पथ्यं सांगितली असतील तर ती नक्की पाळा…मीरा सांगते.

 मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज