कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने बुधवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार राजू यांच्यावर बुधवारी संध्याकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली, परंतु त्यांचा मेंदू सध्या प्रतिसाद देत नाही. अद्यापही ते बेशुद्धावस्थेत आहेत. पल्सरेटदेखील 60-65 च्या दरम्यान आहे. त्यांच्या हृदयाच्या एका मोठय़ा भागात 100 टक्के ब्लॉकेज आढळले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली असून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

धाकटय़ा भावावरही सुरू आहेत उपचार

राजू यांचा धाकटा भाऊ काजू श्रीवास्तव हेसुद्धा याच रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत आहेत. काजू यांच्या कानाखाली गाठ होती. त्यावर येथे उपचार सुरू असून आपल्या भावाची काळजी घेण्यासाठी राजू दिल्लीला गेले होते. कुटुंबातील दोन्ही मुले रुग्णालयात दाखल झाल्याने श्रीवास्तव कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.