‘संरक्षण’ करणारी उद्योजिका

आजच्या काळात कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पाय पॅमेरे अशी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने आपल्या दैनंदिन आयुष्यात खूपच आवश्यक झाली आहेत आणि या सर्वांचा उपयोग करून आपण आपली आणि आपल्या कुटुंबीयांची, समाजाची रक्षा करतो. नीता प्रभुलाल पवाणी या अशाच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी झाल्या आहेत. अत्यंत संघर्ष करून त्यांनी त्यात यश मिळवले. वाईटापासून तंत्रज्ञानाच्या आधारे एकप्रकारे त्या समाजाचे रक्षणच करीत आहेत.

नीता प्रभुलाल पवाणी या ‘ग्लोबेक्स कॉम्प्युटर सर्व्हिसेस’ या कंपनीच्या संचालिका आहेत. नीता यांचा जन्म मुंबईच्या एका कच्छी कुटुंबात झाला. मात्र त्यांचे शालेय शिक्षण गल्फमधील मस्कत येथे झाले. 10 वीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी एसएनडीटी माटुंगा येथे इंटिरियर डिझायनरचा कोर्स पूर्ण केला. घरात मुलीने शिकले तरी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास तिला परवानगी नव्हती आणि म्हणूनच शिक्षण पूर्ण होताच लग्न लावून दिले जात असे. हिच गोष्ट नीता यांच्याबाबत देखील घडली. 1995 रोजी त्यांचे लग्न झाले आणि एका वर्षातच पदरात एक बाळ पडले.

तिच्या स्वप्नातला संसार कधी पूर्ण झालाच नाही. कारण नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. एके दिवशी हे सर्व काही नीता यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले. त्याच क्षणी त्यांनी स्वतःच्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन तो तथाकथित संसार कायमचा सोडला. वडील प्रभुलाल पवाणी आणि काका महेश यांच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

नव्वदच्या दशकात कॉम्प्युटर्स हिंदुस्थानात नवीन आले होते आणि प्रत्येक कंपनी किंवा घरात कॉम्प्युटर्स विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यावेळेस नीता यांनी ‘ग्लोबेक्स कॉम्प्युटर सर्व्हिसेस’ची स्थापना करून कॉम्प्युटर्स आणि त्या संबंधित सर्व्हिसेस भाडय़ाने देण्याची सुरुवात केली. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आजदेखील मिळत आहे.

जसे प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात तसे नीता यांनाही आले. कधी कॉम्प्युटर्स चोरले गेले तर कधी अधिकची ऑर्डर देऊन मधूनच ते काम बंद करण्यात आले. कारण ती ऑर्डर देणारी कंपनीच बंद पडली. अशा वेळेस न खचता नीता यांनी उपयुक्त अशा कल्पना लावल्या आणि त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत केला.

कॉम्प्युटर्स सोबतच त्यांनी इतर उत्पादनांमध्ये येण्याचा विचार केला आणि अशा वेळेस त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले. नीता यांना व्यवसाय कसा वाढवावा, आपल्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा कशी द्यावी, लोकांच्या दृष्टिकोनातून आपला व्यवसाय कसा बघावा याची शिकवण मिळाली. जी नीता यांना खूपच फायदेशीर ठरली.

हिंदुस्थानमध्ये स्पाय कॅमेऱयाची सुरुवात नीता यांच्या ‘ग्लोबेक्स कॉम्प्युटर सर्व्हिसेस’ कंपनीने केली. ग्लोबेक्स कॉम्प्युटर्सच्या अंतर्गत त्यांनी KRISH या ब्रॅण्डची निर्मिती केली. त्यांच्या कामाच्या पारदर्शकतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना मोठमोठय़ा संस्थांची कामे मिळू लागली. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, महत्त्वाची केंद्र आणि राज्यसरकारी कार्यालये यांच्यासाठी ‘ग्लोबेक्स कॉम्प्युटर सर्व्हिसेस’चे स्पाय कॅमेरे आणि इतर उत्पादन त्यांच्या कार्यासाठी वेळोवेळी मदतीला आली.

फक्त इलेक्ट्रॉनिक सीसीटीव्ही कॅमेरे नसून तर सोलर म्हणजे सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरेदेखील त्या उपलब्ध करून देतात आणि तेदेखील आपल्याला हवे त्या आकारांमध्ये. अशाप्रकारे नीता यांनी नेहमीच त्यांच्या कामांमध्ये नावीन्य आणले आणि त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सहाय्यक अशी उत्पादन त्यांनी पुरवली. ज्याच्या मदतीने अनेक गैरव्यवहार टाळले गेले आणि अनेकांचा जीव वाचवता आला म्हणूनच नीताजी आहेत आधुनिक काळातील दुर्गा.

मुलगा क्रिश यांच्या संगोपनाची पूर्ण काळजी नीता यांच्या आई, वडील आणि बहिण भावांनी घेतली. सिंगल मदर आणि उद्योजिका तेदेखील पुरुषप्राधान्य असलेल्या कॉम्प्युटर्सच्या व्यवसायामध्ये. ज्याचा त्यांना सर्व स्तरावर संघर्ष करावा लागला. घरापासून ते कोर्टापर्यंत त्यांनी पदोपदी संघर्ष केला आणि यश मिळवले.

आज त्यांच्या असा व्यवसायाचा विस्तार संपूर्ण हिंदुस्थानात तसेच परदेशात झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि मानसन्मानाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्याकडे तीनशेहून अधिक उत्पादने आहेत आणि त्यासंबंधित सर्व्हिसेस देखील आहेत. एकेकाळी शांत आणि घाबरलेल्या नीता आज खऱया अर्थाने दुर्गेच्या रूपात दिसतात. वाईटाचा नाश करून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत आणि स्वतःच्या उत्पादनांनी फक्त स्वतःच्याच नाही तर समाजाचे रक्षण करत आहेत.

(शब्दांकन – रचना)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या