चाकरमान्यांनू, 7 ऑगस्टपूर्वी येवा, बाप्पा तुमचोच आसा!

659
फोटो - गणेश पुराणिक

लॉकडाकनमुळा गावााक जावचा ऱ्हवला… पन गणपत्येक मातर कायक होवंदे, आमका जावाकच लागतला. नायतर गणपती कोन बसईत. जावकचं व्हया! मुंबईतल्या चाकरमान्यांची अशी चलबिचल सुरू आहे. गणपतीला गावी जायचे प्लॅनिंग आखले जात आहे. पण त्यांना 7 ऑगस्टपूर्वीच गाव गाठावा लागणार आहे. कारण त्यानंतर सिंधुदुर्गात ‘नो एन्ट्री. तसा प्रस्तावच तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. ‘चाकरमान्यांनू, बाप्पा तुमचोच आसा! पण 7 ऑगस्टपूर्वी येवा!’ असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

7 ऑगस्ट 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश घेता येईल अशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे वृत्त सोशल मिडियावर आज व्हायरल झाले. व्हॉट्सऍप ग्रुपवरून ते चाकरमान्यांपर्यंत पोहोचले आणि संभ्रम पसरला. लॉकडाऊनला मुदतवाढ आणि गणेशोत्सवात जिल्हाबंदी यावर नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीतील हे वृत्त आहे. हा आदेश नसल्याचे जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे. पण गणपतीसाठी रजा टाकण्याच्या विचारात असलेल्या चाकरमान्यांना मात्र टेन्शन आले आहे.

31 जुलैपर्यंत तर लॉकडाऊन आहे. ई-पासशिवाय जिल्ह्यात कुणालाही प्रवेश नाही. पण त्यानंतर मात्र चाकरमान्यांचे पाय गावच्या दिशेने नक्कीच वळतील. गणपतीसाठी लाखो चाकरमानी गावी जातात. यंदा मे महिन्यात कुटुंबाला घेऊन गावी जाता आले नाही. त्यामुळे गणपतीमध्ये सहकुटुंब गाव गाठण्याचा अनेकांचा विचार आहे. रेल्वे, एसटीचे अद्याप काही खरे नसल्याने खासगी वाहने घेऊन जाण्याचे प्लॅनिंग केले गेले आहे.

गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट रोजी आहे. 7 ऑगस्टपर्यंत चाकरमानी गावी पोहोचले तर चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येईल. हाच विचार करून जिल्हाधिकाऱयांनी पोलीस आणि जिल्हा यंत्रणेच्या सहमतीने 7 ऑगस्टचा प्रस्ताव बनवला आहे. चाकरमान्यांच्या क्वारंटाईनची जबाबदारी ग्रामपंचायती आणि ग्राम समित्यांकडे राहणार आहे. आता या प्रस्तावाला सरकारची मंजूरी मिळाल्यानंतरच अंतिम आदेश जाहीर केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या