राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरी, कांदिवलीचे ‘शताब्दी’ रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

पालिकेचे कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय लवकरच कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, सिटीस्पॅन अशा अनेक अद्ययावत आणि अत्याधुनिक सुविधा असणारे ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ होणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी दहा मजली स्वतंत्र आणि प्रशस्त इमारत बांधण्यात येणार असून 325 खाटांची व्यवस्था असेल. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी रुग्णालयासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे.

कांदिवली पश्चिम येथील पालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय पश्चिम उपनगरातील हजारो नागरिकांसाठी सोयीचे ठरते. शताब्दी रुग्णालयात सध्या 445 खाटांची व्यवस्था आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येत असतात. कोविड काळात शताब्दी रुणालय पश्चिम उपनगर आणि विशेषतः उत्तर मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या रुग्णालयात कोरोना लसीकरण पेंद्रही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती. भव्य इमारत आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक होती. आता ही परवानगी मिळाल्यामुळे या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पश्चिम उपनगरवासीयांना मिळणार दर्जेदार सुविधा

पश्चिम उपनगरात पालिकेचे अंधेरी येथील कूपर रुग्णालयासारखे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. शिवाय जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्येही अद्ययावत सुविधा आहेत. या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल होतात. मात्र आता कांदिवलीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार असल्याने पश्चिम उपनगरवासीयांना नजीकच्या अंतरावर अद्ययावत उपचार मिळणार असून पालिकेच्या शहरातील प्रमुख रुग्णालयांवरील भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या