प्लॅस्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

1227

शहराला प्लॅस्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा. नागरिकांमध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करा. ‘मी प्लॅस्टिक वापरणार नाही’ ही लोकचळवळ व्हावी, या दृष्टीनेही प्रयत्न करा, अशा सूचना पर्यावरण, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मनपा प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर शहर सुंदर बनविण्यासाठी आणि येथील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी सर्व सोयी सुविधा नागरिकांना द्या, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिकेच्या विकासकामांसंदर्भातील अदित्य ठाकरे यांनी बैठकीत आढावा घेतला. बैठकीस उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलिल, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींसह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जागतिक पातळीवर जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नावलौकिक आहे. या ठिकाणी ऐतिहासिक असा अमुल्य ठेवा आहे. या शहराला अधिक सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने अधिक कार्यक्षमपणे येथील नागरिकांना सुविधा देण्यावर भर द्यावा. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. शहरातील रस्त्यांची योग्य देखभाल करावी. पदपथासाठी एम्बॉस काँक्रिटीकरण पर्यायाचा विचार करावा. त्याचबरोबर रस्त्याच्या पदपथाचे सुशोभिकरण करावे. रस्ता, पदपथ, दुभाजक, दिवे यांची दुरूस्ती सातत्याने करावी. शहराला विद्रूप करणाऱ्या चारचाकी, अतिक्रमणे तत्काळ हटवावीत. वृक्षारोपणावरही भर द्यावा. शहरात नागरिकांना देण्यात येत असलेल्या शहर बस बरोबरच कमी पल्ल्याच्या अंतरासाठी मिनी बस सेवा असावी. तर पर्यटन बस सुविधा देण्याबाबतही मनपाने कार्यवाही करण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पर्यटन आणि पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी दिल्या.

तसेच वेरूळकडे जाण्यासाठी नवीन रस्ता, मनपाच्या वतीने तयार करण्यात येत असलेला सफारी पार्क, शहरातील नाट्य मंदिरे दुरूस्तीकरण आदींचा प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी आज दिल्या. पालकमंत्री देसाई यांनीही अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

मनपा आयुक्त पांडेय यांनी पीपीटीद्वारे माहिती सादर केली. यामध्ये शहरातील 100 कोटीतून तयार करण्यात येत असलेले रस्ते, मुख्यमंत्री शहर सडक योजना, नवीन पाणी पुरवठा योजनेची कार्यवाही, घनकचरा प्रक्रिया केंद्र, सातारा-देवळाई भूमिगत गटार योजना, सातारा-देवळाई भागातील रस्त्यांचा, उद्यानांचा विकास करणे, पथदिवे बसवणे, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सफारी पार्क, स्मार्ट सिटी बस, स्मार्ट वॉक वे, नऊ दरवाजांचे संवर्धन, सलीम अली सरोवर येथील मलजल प्रक्रिया केंद्र आदींचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या