हिंदमाताजवळ होणार सरकत्या जिन्यांचा पूल, रहिवासी-प्रवाशांसह रुग्णांना मोठा फायदा

हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी भूमिगत टाक्यांचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता या ठिकाणी सुलभ रहदारीसाठी नवा सरकत्या जिन्यांचा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यामुळे रहिवासी-प्रवाशांसह परिसरातील केईएम, वाडिया आणि टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण-नातेवाईकांना ये-जा करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

परळ परिसरात असणारी कापडाची दुकाने, मोठय़ा रुग्णालयांसह दाट लोकवस्तीमुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. पावसाळय़ात हिंदमाता परिसरात वर्षानुवर्षे पाणी तुंबण्याची समस्या होती. मात्र  अतिवृष्टीत साचणारे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये नेण्याचा प्रकल्प सुरू केल्यामुळे या भागाची पाणी तुंबण्यातून सुटका झाली आहे. मात्र हिंदमाता ओव्हरब्रिज आणि परळ ब्रिज जोडण्यात आले असले तरी पादचाऱयांना कळसा घालून जाके लागते. त्यामुळे हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.

असा होणार फायदा

  • पावसाळय़ात वाहतुकीच्या सुविधेसाठी परळ आणि हिंदमाता उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्याची उंची 1.2 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जून 2021 मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर पाऊस सुरू असतानाही या ठिकाणची वाहतूक सुरू राहण्यास मदत झाली.
  • मात्र रहिवासी, विभागातील रुग्णालयांत जाण्यासाठी येणारे रुग्ण-नातेवाईक आणि प्रवाशांना वळसा घालून जावे लागते. मात्र या पादचारी पुलामुळे गैरसोय दूर होणार आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

अंधेरीत 350 कोटींचा पूल

अंधेरी पश्चिम येथील जुहू-वर्सोवा मार्गापासून सी.डी. बर्फीवाला लेनपर्यंत पालिकेच्या माध्यमातून 350 कोटींचा नवा ब्रिज बांधण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या ब्रिजमुळे ‘जेव्हीपीडी’ जंक्शनजवळ होणाऱया वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.