रूबाबदार ऐतिहसिक!

पूर्णिमा ओक, फॅशन डिझायनर

ऐतिहासिक चित्रपट, मालिका ज्याप्रमाणे होऊ लागले आहेत… त्याप्रमाणे ऐतिहासिक वेशभूषाही लोकप्रिय होऊ लागल्या आहेत…

ऐतिहासिक वेशभूषा करायला मजा येते. जेव्हा पहिल्यांदा याचं स्पेशलायजेशन केलं तेव्हा अनेकजण बोलले. तू मर्यादित गोष्टीमध्ये अडकणार, प्रत्येकवेळी काम मिळेलच असं नाही वगैरे मला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, पण माझी या सगळ्यासाठी तयारी होती. म्हणूनच आज मला आनंद होतोय की आज जे मी केले त्याचा मला फायदा होतोय, आज ऐतिहासिक चित्रपट, मालिका यासाठी काम करतेय यातच समाधान आले. अशा प्रकारच्या वेशभूषा करायला बरीच मेहनत तर लागतेच, पण अभ्यासही खूप लागतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापड समजावं लागतं. कारण ते कापड त्या काळातलं दिसलं पाहिजे. बऱयाचदा असं होतं की सिनेमाचं तेवढं बजेट नसतं. तेव्हा हातमागावर कपडे असायचे आता मशीन्सवर असतात. पण एखाद्या मालिकेसाठी कपडे तयार करायचे असतील तर हातमागावरचे कपडे परवडणारे नसतात. अशावेळी हातमागासारखी दिसणारी मशीन ऍम्बॉयडरी करून बघतो किंवा कापडाचा दर्जा तपासावा लागतो असे त्या सांगतात.

ethinic-2

दागिने बनवून घ्यावे लागतात

बऱयाचदा इतिहासकालीन दागिने बनवून घ्यावे लागतात. कारण त्या काळातले दागिने मिळत नाहीत. जे दागिने आधीपासूनच बाजारात आहेत तेच दागिने दिले तर नव्याने काही फॅशनमध्ये येणार नाही. त्यामुळे प्रयत्न असतो की दागिने जुन्या काळातले पण वाटायला हवे आणि आताच्या फॅशन ट्रेण्डमध्येही यायला हवे. संभाजीमध्ये सोयराबाईंच्या दोन नथी दिल्या आहेत, त्या पूर्णपणे वेगळ्या पद्धतीच्या आहेत. सोयराबाईंचे वेगळ्या पद्धतीचे बाजूबंद केले आहेत. येसूबाईंच्या ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन केले आहेत. दागिने डिझाईन करताना खूप मजा येते.

हिंदुस्थानी फॅब्रिकचे वेस्टर्न कपडे

ऐतिहासिक वेशभूषेकडे आपसुकच कल आहे. फॅशन डिझायनिंग करताना पारंपारिक कपडे हा मुख्य विषय होता. तेव्हा ट्रेडिशनल घेतले होते कारण फ्युजन करायचे होते. हिंदुस्थानी फॅब्रिकचे वेस्टर्न कपडे करायचे. खणाचे वेस्टर्न टॉपही केले होते. ‘वीर सावरकर’ चित्रपटात ऐतिहासिक वेशभूषेवर काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा खऱया अर्थाने आवड निर्माण झाली.

स्टाइल आणि काळ याचा मिलाफ

ट्रेडिशनल वेशभूषा करायला आवडते. शिवाजी महाराजांचे कपडे, संभाजी महाराजांचे कपडे करायला आवडतात. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कपडय़ांमधला फरक दाखवायचा असतो. त्यांचा अंगरखा वेगळा असतो. प्रत्येक पिढीत थोडा बदल होत असतो, पण त्यात स्टाईल आणि क़ाळ जपता आला पाहिजे. म्हणून त्यांच्या कपडय़ांसाठी ज्युट वापरले. ज्युट हे आताचे फॅब्रिक आहे ते दिसायला रफ असल्याने ते त्याकाळातले पण वाटते. ब्रोकेड आणि ज्युट कॉम्बिनेशन केले आहे.

व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास लागतो

मृणाल कुलकर्णी यांचा ‘रमा माधव’ हा चित्रपट केला आहे. त्यात आनंदीबाई, गोपिकाबाई, पार्वतीबाई आणि रमा अशा चार प्रकारच्या वेगळ्या बायका होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व समजण्यासाठी त्यांची आत्मचरित्र वाचले. त्यांचे स्वभाव त्यांचे कपडे व दागिन्यातून दाखवायचे होते. तो एक अभ्यासच होता. दिसायला चौघीही सुंदर होत्या, पण प्रत्येकीची स्टाइल वेगळी होती.  साधेपणा, सोज्वळता त्यांचे कपडे आणि दागिन्यांमधून दाखवणेही तितकेच महत्त्वाचे होते.