असाही एक विवाह

133

>>नमिता वारणकर

तृतीयपंथीयांसाठी शाळा, रोजगार, तसेच इतर गरजा पूर्ण व्हाव्यात याकरिता शासन तसेच सामाजिक स्तरावर प्रयत्न केले जातात, मात्र तृतीयपंथीयही एक माणूस असून त्यांनाही प्रेम, आपुलकी आणि विशेषतः कुटुंबाची गरज असते. याकरिता कुटुंब आणि त्यातून निर्माण होणाऱया विविध नात्यांचे बंध पूर्ण करण्याकरिता माधुरी सरोदे आणि प्रेम जयकुमार शर्मा यांनी जाहीरपणे विवाह करून समाजात एक नवीन पाऊल उचलेले आहे.

या अनोख्या निर्णयाविषयी माधुरी सरोदे सांगतात की, आमच्या कम्युनिटीमध्ये खूप जण लपूनछपून लग्न करतात, पण मला इतर मुलींसारखंच मेंदी, हळद असे सर्व पारंपरिक सोहळे आणि विधींसह लग्न करण्याची खूप इच्छा होती. माझ्या पतीचीही हीच इच्छा होती. याकरिता जाहीरपणे विवाह करून आम्ही आमची इच्छा पूर्ण केली. याचा आम्हाला खूप आनंद होतोय.
त्या पुढे म्हणाल्या की, लग्न करणार म्हणजे नक्की काय करणार? इतर बायकांसारखं लग्न करून कशाला कुटुंब निर्माण करायचं? यामुळे आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाईल? सर्वसामान्यांचं टिकत नाही तर तुझं लग्न कसं टिकेल अशा वाईट प्रतिक्रिया काहीजणांनी दिल्या, तर काहीजण चांगलंही म्हणाले. म्हणजे तुझ्यात खूप हिंमत आहे म्हणून हा प्रयत्न तू करू शकतेस वगैरे… आम्ही जेथे राहतो त्या सोसायटीमध्ये सगळ्यांना माहीत आहे. पण तरीही मला सगळे स्वीकारतील हा मला पूर्ण विश्वास आहे. शिवाय विवाह करून सर्वसामान्य व्यक्तीसारखं जीवन जगण्याचा माधुरी आणि त्यांचे पती यांचा ठाम निश्चय होता. तो त्यांनी हा विवाह करून पूर्ण केला.

तृतीयपंथी समाजातील नायकांचा विरोध

कम्युनिटीमध्ये सगळ्यात मोठे जे नायक असतात त्यांनी आमच्या लग्नासाठी आलेल्या आमच्या समाजातील सगळ्यांना बोलावून घेतलं. विरोध केला पण हे लग्न माझ्या कुटुंबाने अरेंज मॅरेज पद्धतीने ठरवल्यामुळे ते फार विरोध नाही करू शकले नाहीतर काही वेळा नायक आमच्याकडे पैशाची मागणीही करतात, असे माधुरी सांगते.

कायदेशीर विवाहाचा हक्क सरकारकडून मिळण्याची अपेक्षा

हा विवाह करून आम्ही आमची लढाई २५ टक्के जिंकली आहे. उर्वरित ७५ टक्के लढाई आम्हाला मॅरेज सर्टिफिकेट आणि मूल दत्तक घेताना लढावी लागणार आहे. सरकारने मला एक महिला म्हणून मॅरेज सर्टिफिकेट न देता एक तृतीयपंथी (ट्रान्सजेडर) म्हणून द्यावे, अशी माझी इच्छा आहे. हे सरकारकडून मिळवण्याकरिता मला खूप लढावं लागणार आहे. त्याकरिता कोणत्याही पातळीवर लढण्याची आमची तयारी आहे. तसेच सरकारने आम्हाला फक्त महिलांचे हक्क दिलेत, पण महिला लग्न करते मग आम्हालाही लग्न करण्याचा आणि मूल दत्तक घेण्याचा हक्क आहे, याचा सरकारने विचार करावा, असे ती म्हणते.

रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न

आर्थिक उत्पन्न मिळावं याकरिता सगळ्या तृतीयपंथियांकडून डान्स शोचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे नवीन शिकणाऱयांनाही संधी दिली जाते. सामान्य महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांसाठी नवीन उद्योग सुरू करण्याची माधुरी यांची इच्छा आहे.

तृतीयपंथीयांचा विवाह… ऐकून वेगळे वाटतेय ना… होय. एक सामान्य आयुष्याची ओढ प्रत्येकालाच असते…. तृतीयपंथीयांसाठी विवाहमंडळ चालवणार या समाजात काही जण एकटे किंवा गटाने राहतात, काही जण कुटुंब सोडून येतात. आमच्यापैकी ९० टक्के लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. विवाहामुळे आम्हाला कुटुंब मिळेल याकरिता आम्ही केलेल्या विवाहामुळे इतर तृतीयपंथीयांनीही आमच्यासारखंच जाहीरपणे विवाह करण्याकरिता पुढाकार घ्यावा, यासाठी आम्ही तृतीयपंथीयांकरिता विवाहमंडळ चालवून त्यांना लग्नासाठी मदत करणार आहोत. कारण लग्नामुळे आमच्या समाजाचे कुटुंबात रूपांतर होते.

समाजाने आम्हाला प्रेम द्यावे!

आम्हीही एक माणूस असून, आम्हाला लग्न करून समाजात आणि कुटुंबात राहण्याचा हक्क आहे. याकरिता समाजाने आम्हाला साहाय्य करून प्रेम द्यावे. आमची ही गरज प्रसारमाध्यमांनी सरकारपर्यंत पोहोचवावी तसेच मला जो संघर्ष करावा लागणार आहे तो संघर्ष इतर तृतीयपंथीय जोडप्यांना करावा लागू नये. याकरिता आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, असे माधुरी आपुलकीने सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या