युरो फुटबॉल चॅम्पियनशिप- इंग्लंडची क्रोएशियाला किक!

गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या फुटबॉल संघाने रविवारी घरच्या मैदानावर दमदार कामगिरी केली. रहीम स्टर्लिंगने केलेल्या शानदार गोलच्या जोरावर यजमान इंग्लंडने क्रोएशियाला 1-0 अशा फरकाने हरवत युरो फुटबॉल चॅम्पियनशिप ‘गट डी’मध्ये महत्त्वाच्या तीन गुणांची कमाई केली. याचसोबत इंग्लंडने 2018 सालामधील फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाची परतफेडही या वेळी केली. फिफा वर्ल्ड कपमध्ये क्रोएशियाने इंग्लंडला हरवत फिफा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. मात्र फ्रान्सकडून पराभूत झाल्यामुळे क्रोएशियाचे ऐतिहासिक जेतेपदाचे स्वप्न भंग पावले होते.

फिलिप्सचा अफलातून पास

इंग्लंड व क्रोएशिया यांच्यामधील लढतीत एक गोल झाला. क्रोएशियाकडून मधल्या फळीत गॅप तयार झाला. त्यांना ही चूक महागात पडली. हा गॅपचा इंग्लंडने फायदा घेतला. पॅलवीन फिलिप्सच्या कल्पक पासच्या जोरावर इंग्लंडला आघाडी घेता आली. पॅलवीन फिलिप्सच्या अचूक पासचे गोलमध्ये रूपांतर करण्यात रहीम स्टर्लिंगला यश लाभले. इंग्लंडने 57व्या मिनिटाला गोल केला.

कॉम्बिनेशन बदलले

गॅरेथ साऊथगेट यांनी या लढतीत इंग्लंडच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल केला. इंग्लंडचा संघ बहुतांशी वेळा 4-3-3 अशा कॉम्बिनेशनने मैदानात उतरतो. पण या लढतीत इंग्लंडचा संघ 4-2-3-1 अशा कॉम्बिनेशनने मैदानात उतरला. हॅरी केनच्या खांद्यावर फॉरवर्डची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी रहीम स्टर्लिंग, मेसन माऊण्ट व फील पह्डेन यांनांही मिडफिल्डर तसेच फॉरवर्डची जबाबदारी पार पाडावी लागत होती.

आता स्कॉटलंडला भिडणार

इंग्लंडच्या संघाने युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील पहिली लढत जिंकण्याची ही पहिलीच खेप ठरली. आता डी गटामधील पुढील लढतीत इंग्लंडला स्कॉटलंडशी दोन हात करावे लागणार आहेत. तसेच क्रोएशियाला झेक प्रजासत्ताकचा सामना करावा लागणार आहे.

इंग्लंड – क्रोएशिया लढतीची आकडेवारी

इंग्लंड क्रोएशिया
गोल 1 0
शॉट 8 8
शॉट ऑन टार्गेट 2 2
बॉलवरील ताबा 52 48
ऑफसाईड 2 2
कॉर्नर्स 1 1
यलो कार्ड 1 3
रेड कार्ड 0 0

आपली प्रतिक्रिया द्या