युरो फुटबॉल चॅम्पियनशिप, नेदरलॅण्डचे पाऊल पडते पुढे

नेदरलॅण्डच्या फुटबॉल संघाने गुरुवारी मध्यरात्री ऑस्ट्रियाला 2-0 अशा फरकाने धूळ चारली आणि युरो फुटबॉल चॅम्पियनशिपच्या बाद फेरीत पाऊल टाकले. मेमफीस डिपेने 11व्या मिनिटाला आणि डेनझेल डमफ्रीसने 67व्या मिनिटाला गोल करीत नेदरलॅण्डच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नेदरलॅण्डने साखळी फेरीतील दोन विजयांसह सी गटातून बाद फेरीत प्रवेश केला असून आता या गटातून आणखी कोणता संघ पोहचेल याचे उत्तर अखेरच्या साखळी फेरीतील निकालानंतर समजेल. युव्रेन व ऑस्ट्रिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय संपादन केला असून आता या दोन संघांमध्ये या गटातून आगेकूच करण्यासाठी चुरस लागली आहे. नॉर्थ मॅसेडोनियाला पहिल्या दोन्ही लढतींमध्ये हार सहन करावी लागली आहे.

बेल्जियमही अंतिम 16मध्ये

बेल्जियम संघाने ब गटामधून अंतिम 16 फेरीमध्ये एण्ट्री मारली. सलामीच्या लढतीत रशियाला हरवणाऱया बेल्जियमने गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत डेन्मार्कला 2-1 अशा फरकाने पराभूत करीत दोन विजय व सहा गुणांसह आगेकूच केली. थोरगन हझार्ड याने 55व्या मिनिटाला आणि केव्हीन डी ब्रुएनने 70व्या मिनिटाला गोल केले.

लढतीच्या पूर्वार्धात युसूफ पॉलसेन याने डेन्मार्कसाठी गोल करीत आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात बेल्जियमच्या फुटबॉलपटूंनी प्रतिमेला साजेसा खेळ करीत विजय खेचून आणला.

आपली प्रतिक्रिया द्या