ऍरोबिक्स

100

संग्राम चौगुले ..[email protected]

ऍरोबिक्सचा कोणताही प्रकार पुरुष आणि महिला या दोघांनाही चांगला फायदा देणारा असतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करायला कुणाकडे वेळ आहे? नोकरीचा व्याप, वातावरणातील प्रदूषण यामुळे हृदय आणि फुप्फुस यांना फार मोठा त्रास होत असतो. आता प्रदूषण तर आपण टाळू शकत नाही… मग असे काही व्यायाम प्रकार करून त्या प्रदूषणांचा आपल्या हृदय व फुप्फुसांवर परिणाम होणार नाही, ते स्ट्राँग राहातील असे पाहिले पाहिजे. त्यासाठीच ऍरोबिक्स हा सर्वांसाठी उपयोगी असा व्यायाम प्रकार आहे. यामुळे हृदय आणि फुप्फुसाची क्षमता वाढते आणि रोजच्या जीवनात त्याचा फायदा सुखकर आयुष्य जगण्यासाठी होतो.

जिममध्ये घेतले जाणारे व्यायाम प्रकार आणि ऍरोबिक्समधले व्यायाम प्रकार यांच्यात खूपच फरक आहे. जिममध्ये शरीर फिट आणि हिट राहण्यासाठी काळजी घेतली जाते, पण ऍरोबिक्सच्या माध्यमातून हृदय आणि फुप्फुसे तंदुरुस्त ठेवता येतात. डान्सिंग, रनिंग, स्विमिंग, स्पायनिंग, ऍक्वा ऍरोबिक्स, किक बॉक्सिंग… असे ऍरोबिक्सचे अनेक प्रकार आहेत. ते करत राहिल्यास नकळत हृदयाला चांगला फायदा होतो.

जिममध्ये शारीरिक व्यायाम प्रकारांवर भर दिला जातो. त्यामुळे साधारणपणे ते व्यायाम पुरुषांसाठी आहेत अशी धारणा झालेली आहे. मात्र महिलांमध्ये ऍरोबिक्स लोकप्रिय आहे. ते केवळ महिलांसाठी असल्याचा एक गैरसमज पसरलेला आहे. वास्तविक ऍरोबिक्सचा कोणताही प्रकार पुरुष आणि महिला या दोघांनाही चांगला फायदा देणारा असतो. जिममध्येही ट्रेडमिलवर पळण्याचा व्यायाम प्रकार असतोच.. पण तशा पद्धतीने ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा ऍरोबिक्स करणे केव्हाही चांगले ठरेल.

ऍरोबिक्सचे एकूणच फायदे कोणते असा विचार केला तर पहिला फायदा म्हणजे या व्यायाम प्रकारांमुळे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात. दुसरं म्हणजे हातापायांचे स्नायू बळकट होतात. शरीर तंदुरुस्त असले म्हणजे मग आत्मविश्वास प्रचंड वाढतो हा तिसरा पायदा म्हणता येईल. सतत ऍरोबिक्स केल्यामुळे शरीरातील हाडांची क्षमताही बऱयापैकी वाढते हेही नसे थोडके.

 

संगीताच्या तालावर

ठरावीक तालावर ऍरोबिक्सचे व्यायाम प्रकार केले जातात. शाळेत असताना शिटीवर कसरती केल्या जायच्या. त्याच धर्तीवर ऍरोबिक्समध्येही म्युझिकच्या तालावर साधारणपणे तासभर व्यायाम केला जातो. तालात केलेले असल्याने शरीराला तो वेग मिळतो आणि जास्त चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. ऍरोबिक्समध्ये हार्टरेट वाढल्यामुळे साधारण व्यायामापेक्षा जास्त फॅटस् बर्न होतात. ऍरोबिक्सचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे हात आणि पायांना जास्तीत जास्त चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे हातापायांचे स्नायू बळकट होऊन शरीराला खरी हवी ती ताकद मिळते.

 

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या