जगभरात मंदीची चाहूल; युरोपातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदीला सुरुवात

जगातील महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेत आर्थिक संकटाचे सावट आहे. त्यातच आता युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत मंदी आली आहे. त्यामुळे जगभरात येणाऱ्या मंदीची ही चाहूल समजली जात आहे. अमेरिका आणि जर्मनीतील मंदीचे जगभरात पडसाद उमटणार आहेत.

युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीमध्ये मंदी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली होती. आता जीडीपीचे आकडे जाहीर झाल्याने जर्मनीत मंदी आल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार जर्मनीचा जीडीपी सलग दोन तिमाहीत घसरला आहे.

2023 च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या तिमाही आकडेवारीनुसार वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी 2022 च्या चौथ्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी 0.5 टक्क्यांनी घसरला होता. जेव्हा जेव्हा एखादी अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवते, तेव्हा ती मंदीमध्ये असल्याचे मानले जाते.

जर्मनीतील महागाईच्या स्थितीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. घरगुती वस्तूंच्या वापरात 1.2 टक्के घट झाली आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र, कोरोना काळापासून त्यांच्या निर्यातीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जर्मनी हा देश अजूनही कोरोनाच्या तडाख्यातून बाहेर पडू शकलेला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला असला तरी जर्मनीत मंदी दिसू लागली आहे.

जर्मनीच्या या क्षेत्रासमोर गंभीर आव्हाने आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. बँकांच्या म्हणण्यानुसार कच्च्या मालाची कमतरता आणि कामगारांची उपलब्धता अडचणीत भर घालत आहे. जर्मन सेंट्रल बँकेच्या मते 2021 च्या शेवटच्या टप्प्यात परिस्थिती निश्चितच सुधारली होती, परंतु 2022 च्या आकडेवारीने या सुधारणेच्या आशा धुळीस मिळवल्या.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जर्मनीवरील मंदीचे सावट अधिक गडद झाले होते. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत अशी 100 हून अधिक क्षेत्रे होती, जी रशियाला मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवा पुरवत असतात.रशिया-युक्रेन युद्धाने सर्व काम थांबले होते. दुसरीकडे जर्मनीचा गॅस पुरवठाही मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धाने येथेही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.