लस वितरणास अक्षम्य उशीर, युरोपिअन महासंघ अॅस्ट्राझेनेकावर संतापला

एकीकडे जगातील काही देशांमध्ये कोरोनाची लस टोचण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे तर दुसरीकडे इंग्लंड, जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये अजूनही कोरोना नियंत्रणात न आल्याने पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करावा लागत आहे. ही राष्ट्रे तातडीने कोरोनावरील लस मिळावी यासाठी सुरुवातीपासून धडपड करत होती. असं असताना युरोपिअन महासंघातील राष्ट्रांना अॅस्ट्राझेनेका या लस उत्पादन करणाऱ्या कंपनीमुळे भयंकर त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने पूर्वी मान्य केल्याप्रमाणे आम्ही वेळेत, आधी कबूल केल्याप्रमाणे लसींचा साठा पुरवू शकत नाही असं म्हटलंय. या विधानानंतर युरोपिअन महासंघाने कंपनी प्रतिनिधींना सोमवारी तत्काळ बोलावून घेत त्यांना खडसावल्याचे वृत्त आहे.

युरोपिअन महासंघातील सदस्य राष्ट्रांना लस प्राथमिकतेने मिळावी यासाठी अॅस्ट्राझेनेकासोबत करार करण्यात आला होता. या करारापोटी कंपनीला 336 दशलक्ष युरो देण्यात आलेले आहेत. तरीही लस मिळण्यास उशीर होत असल्याने महासंघाचे प्रतिनिधी संतापले आहेत. महासंघाच्या आरोग्य आयुक्त स्टेला कायरिआकीडस यांनी म्हटलंय की जो करार करण्यात आलेला आहे त्यानुसार कंपनीने लसपुरवठा केलाच पाहिजे. लसीच्या वितरणासंदर्भात अॅस्ट्राझेनेकाच्या प्रतिनिधींना जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही असंही स्टेला यांनी म्हटले आहे. महासंघाच्या या पवित्र्यानंतर अॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की कंपनी लसीचा पुरवठा करण्यासाठी जे शक्य होईल ते सर्व उपाय करत आहे.

युरोपिएन महासंघाने अॅस्ट्राझेनेका कंपनीला लसीसाठीच्या करारापोटी जवळपास 2900 कोटी रुपये दिलेले आहेत. या बदल्यात कंपनीकडून महासंघाला 30 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार होते. कंपनीकडून महासंघाला सध्या फक्त 3 कोटी 10 डोस देऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. उत्पादन कमी झाल्याने लसींचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचं अॅस्ट्राझेनेकाचं म्हणणं आहे.

जर कंपनीने कराराच्या अटींच्या अधीन राहून लसींचा पुरवठा केला नाही तर अॅस्ट्राझेनेकाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. लसींचा आकडा जो पूर्वी मान्य करण्यात आलेला होता, तो आपल्याला मिळणार नाही याची युरोपिअन महासंघाला पूर्ण खात्री पटली आहे, यामुळे त्यांनी अॅस्ट्राझेनेकाला जबर दंड ठोठावण्याबाबत विचार सुरू केला आहे. मात्र तूर्तास यावर भाष्य करणं अयोग्य ठरेल असं या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्यांचे म्हणणे आहे.

युरोपिअन महासंघाला आणखी एक भीती सतावते आहे ती म्हणजे जर या कंपनीला दंड ठोठावण्यात आला तर त्यांनी लसीसाठी दिलेल्या आगाऊ रकमेतून तयार होणारी लस ही जगातील इतर देशांना दिली जाईल, ज्यामुळे त्यांच्या हाती काहीच पडणार नाही. या गोष्टीला कसा आळा घालता येईल याबाबतही सध्या महासंघ विचार करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या