युरोप, अमेरिकेचेच वर्चस्व बाद फेरीत दोन खंडांतील देशांचीच बाजी

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

रशिया येथे सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा युरोप व अमेरिका या खंडांतील देशांचेच वर्चस्व दिसून येत आहे. बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतींच्या निकालानंतर बाद फेरीत पोहोचलेल्या संघांवर कटाक्ष टाकल्यास युरोप व अमेरिका या खंडांतील देशांचीच मक्तेदारी प्रकर्षाने दिसून आली आहे. आशिया व आफ्रिका खंडांतील देशांकडून याही वर्ल्ड कपमध्ये सपशेल निराशा झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन खंडांतूनच जगज्जेता लाभेल हे जवळपास निश्चित झाले आहे. पण कोणता देश विश्वविजेत्याची माळ आपल्या गळय़ात घालेल याचे उत्तर १५ जुलै रोजीच मिळेल.

माजी विश्वविजेत्यांचा निभाव लागेल का?
या वर्ल्ड कपमध्ये माजी विश्वविजेत्यांनीही बाद फेरीत प्रवेश केलाय. यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, ब्राझील व उरुग्वेचा समावेश आहे. आतापर्यंत फक्त जर्मनी या गतविजेत्याला साखळी फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. आता बाद फेरीचा थरार सुरू झाल्यानंतर माजी जगज्जेते कुठपर्यंत मजल मारताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

…तर मेस्सी–रोनाल्डो येणार आमने-सामने
या जनरेशनमधील दोन स्टार खेळाडू एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्जेंटिनाने पुढल्या फेरीत फ्रान्सला तर पोर्तुगालने उरुग्वेला पराभूत केल्यास अर्जेंटिना व पोर्तुगाल हे संघ उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांना भिडतील. या लढतीत लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन दिग्गज खेळाडूंमधील चुरस तमाम फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळेल.

आशियाची मदार जपानवर
आफ्रिका खंडातील एकाही देशाला बाद फेरीत पोहोचता आले नाही. तसेच आशिया खंडातून जपानच्या रूपात एकच देश पुढच्या फेरीत गेला.

युरोप खंडातून पात्र ठरलेले देश
फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, रशिया, क्रोएशिया, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम

दक्षिण-मध्य अमेरिकन खंडातून पात्र ठरलेले देश
अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे, मेक्सिको, कोलंबिया

अंतिम १६ फेरीच्या लढती खालीलप्रमाणे
३० जून – फ्रान्स वि. अर्जेंटिना
३० जून – उरुग्वे – पोर्तुगाल
१ जुलै – स्पेन – रशिया
१ जुलै – क्रोएशिया – डेन्मार्क
२ जुलै – ब्राझील – मेक्सिको
३ जुलै – स्वीडन – स्वित्झर्लंड

आपली प्रतिक्रिया द्या