हिंदुस्थानला गरीब म्हटल्याने स्नॅपचॅटच्या मानाकंनात घसरण

17

सामना ऑनलाईन । मुंबई

स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल यांनी हिंदुस्थानला गरीब देश म्हटल्याचा फटका स्नॅपचॅटला बसला आहे. अनेक हिंदुस्थानी नागरिकांनी स्पिगेल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत स्नॅपचॅट अॅप्लिकेशन अनइन्स्टॉल केलं आहे. त्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात मोठी घसरण झाली आहे.

”स्नॅपचॅट हे अॅप श्रीमंतांसाठी आहे. हिंदुस्थान आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये या अॅपचा विस्तार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे उद्गार २०१५ साली झालेल्या एका बैठकीमध्ये स्पिगेल यांनी काढले होते. यासंबंधिचं वृत्त एका मॅगझिनने दिल्यानंतर हिंदुस्थानात याचे अत्यंत तीव्र पडसाद उमटले आहेत. स्नॅपचॅट वापरत असलेल्या अनेक हिंदुस्थानींनी या अॅपला अतिशय कमी मानाकंन देत ते मोबाईलमधून अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली. इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक मानांकन मिळाल्यामुळे या अॅप्लिकेशनचं गुगल प्लेस्टोअर वरील रेटिंग घसरलं आहे.

इंटरनेट वापराच्या बाबतीत हिंदुस्थान हा सर्वाधिक वेगाने वाढणारा देश आहे असं एका प्रसिद्ध अर्थदैनिकाने म्हटलं होतं. २०२० पर्यंत हिंदुस्थानामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत अडीच पट वाढ होणार आहे. तूर्तास हिंदुस्थानात स्नॅपचॅट वापरणाऱ्यांची संख्या ४० लाख आहे. हिंदुस्थानी नागरिकांमध्ये हे अॅप ट्विटर आणि फेसबुकच्या तुलनेत अजिबात प्रसिद्ध नाही. त्यामुळे इव्हान स्पिगेल यांचं हे वक्तव्य स्नॅपचॅटला चांगलंच भोवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या