Video ‘कुत्रेही खाणार नाही हे अन्न’, मेसमध्ये मिळणाऱ्या खराब जेवणामुळे यूपी पोलिसाला रडू कोसळले

हिंदुस्थान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही देशरक्षणासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या पोलिसांची परिस्थिती बिकट आहे. याचा प्रत्युत उत्तर प्रदेशमध्ये आला आहे. फिरोझाबाद पोलीसमध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने खराब जेवण मिळत असल्याची तक्रार केली आहे. मनोज कुमार असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

मनोज कुमार फिरोझाबाद जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पोलीस लाईनमध्ये तैनात आहे. पोलीस लाईनच्या मेसमध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार मनोजने केली आहे. डाळीमध्ये डाळ कमी आणि पाणी जास्त, तर चपातीही अर्धवट कच्ची असते, असा आरोप मनोजने केला आहे. 12-12 तासांची ड्यूटी केल्यानंतरही असे जेवण मिळत असून तक्रारीनंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा दावाही मनोजने केला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी यूपी सरकारला घेरले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल मनोज कुमार जेवणाची थाळी घेऊन पोलीस मुख्यालयाच्या गेटसमोर उभा असल्याचे दिसते. हा व्हिडीओ 10 ऑगस्टला असून जेवणाची तक्रार करताना मनोज कुमारचे डोळे पाणावले. या विभागात ऐकणारे कोणीच नसून 12-12 तासांची ड्यूटी केल्यानंतर आम्हाला असे जेवण मिळतेय. तुमची मुलं तरी असे अन्न खाऊ शकतात का? असा सवाल करत मी सकाळपासून उपाशी असल्याचे मनोज कुमारने म्हटले. मॅनेजरद्वारा आपल्याला निलंबित करण्याची धमकी मिळत आहे. डीजीपींना फोन केला तर त्यांच्या पीएसओने फोन कट कर अन्यथा निलंबित करू असे म्हटले, तर एडीजींनी फोनच उचलला नाही, अशी तक्रार मनोज कुमारने केली आहे.

फिरोझाबाद पोलिसांचे उत्तर

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फिरोझाबाद पोलिसांनी एक ट्विट करत याला उत्तर दिले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून तक्रारदार कॉन्स्टेबलला गेल्या वर्षभरात 15 वेळा अनुशासनहिनता, गैरहजर राहणे आणि निष्काळजीपणा प्रकरणात शिक्षा झाल्याचे फिरोझाबाद पोलिसांनी म्हटले.

विरोधकांचा हल्लाबोल

पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान 18-18 तास कोणासाठी काम करताहेत हे मनोज कुमारचे अश्रु पाहून कळतंय, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.