सरकार पाडण्यात रस नाही! शहांना भेटलो, पण राजकीय चर्चा नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच सरकार अंतर्विरोधाने पडेल असा आशावाद त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्रातील साखरेच्या प्रश्नाच्या निमित्ताने फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या दोन नेत्यांत सुमारे 50 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली. राजस्थानमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत पत्रकारांनी विचारलं असता फडणवीस म्हणाले, ही भेट राजकीय मुळीच नव्हती. महविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार तीन पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचं ते पाहू. कोरोनाची महाराष्ट्रातली स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या दोन गोष्टी मी त्यांच्याशी बोललो. दरम्यान, फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील कोरोनावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गृहमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. तसेच साखर उद्योगांना पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी यावेळी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या