अजिंक्य-शिवानीचे ‘नाते नव्याने’

एव्हरेस्ट म्युझिकने आपल्या यूटय़ूब चॅनेलवर ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे…’ या मुखड्याचे प्रेमगीत शुक्रवारी प्रदर्शित केले असून त्याला संगीतप्रेमींचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात जय आणि मायरा यांची काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशा गोंधळाच्या परिस्थितीतील प्रेमकथा पाहायला मिळते. ‘मन उडू उडू’ फेम अभिनेता अजिंक्य राऊत आणि ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकर यांच्यावर हे गाणे चित्रीत झाले आहे.  गाण्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून एक अनोखा असा प्रयोग मराठीमध्ये केला आहे. गाण्याचा हा व्हिडीओ यूटय़ूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात जाणार आहे, असे  एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीचे संजय छाब्रिया यांनी सांगितले.