एव्हरेस्टकन्या मनीषाला उत्तर अमेरिकेतील डेनाली शिखर सर करायचेय!

75

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जगातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचा शिखरमाथा सर करण्याचे माझे दहा वर्षांपासून स्वप्न होते. मात्र, गतवर्षी आलेल्या अपयशातून चुका दुरुस्त करत मी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करण्याचे धाडस केले आणि मी यात सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वी झाले. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याने मला मोठा आनंद होत आहे. पुढील लक्ष्य हे उत्तर अमेरिकेतील ६ हजार १९० मीटर उंचीवर असणारे डेनाली शिखर सर करावयाचे असल्याचे एव्हरेस्टकन्या मनीषा वाघमारे म्हणाली.

संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने २१ मे रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी एव्हरेस्ट शिखर सर करत मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या पराक्रमानंतर महिला महाविद्यालयाची क्रीडा संचालिका मनीषाचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता विमानाने संभाजीनगरात आगमन झाले. यानंतर पत्रकारांनी तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, दोन महिन्यांच्या मोहिमेनंतर सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण पुन्हा संभाजीनगरात सुखरूप परतलो. दहा वर्षापासून असलेले माझे स्वप्न साकार झाल्याने मला आनंद वाटत आहे. गतवर्षी हिलरी स्टेपजवळ झालेल्या चुकांमधून धडा घेताना आपण जगातील एव्हरेस्ट शिखर सर केले. मोहिमेदरम्यान ऑक्सिजन सिंलिंडरचे रेग्युलेटर खराब झाले होते; परंतु शेर्पाच्या मदतीमुळे मोहीम फत्ते झाली आहे. ५६ दिवसांच्या मोहिमेमध्ये ४० दिवस रोटेशन्स केले आणि ५१ व्या दिवशी आपण माऊंट एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर होतो. ८००० मीटरनंतर डेथ झोन आहे. तेथे १०० पेक्षा जास्त प्रतितास वेगाने हिमवादळ घोंघावते. माझे स्वप्न हे सात खंडातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर सर करण्याचे आहे आणि आता पाच शिखरे आपण यशस्वीपणे पादाक्रांत केली आहेत. पुढील लक्ष्य हे उत्तर अमेरिकेतील ६ हजार १९० मीटर उंचीवर असणारे डेनाली शिखर सर करण्याचे आहे. आपल्या कामगिरीने नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असे यावेळी मनीषा म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या