कश्मीरात ‘ऑल इज वेल’ : राज्यपालांचा दावा

472
satyapal-malik

कश्मीर खोर्‍यातील मोबाईल, इंटरनेट बंद ठेवल्यामुळे सरकारच्या नावाने बोटे मोडणार्‍यांना रविवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी चोख उत्तर दिले. मोबाईल, इंटरनेट बंद ठेवले म्हणून एकही हत्या झाली नाही, अन्यथा आठवडाभरातच किमान 50 बळी गेले असते, असे स्पष्ट करत मलिक यांनी कश्मीरातऑल इज वेलअसल्याचा दावा केला.

कलम 370 हटवल्यापासून धगधगलेल्या जम्मूकश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर हिंसाचार उफाळू नये यासाठी कश्मीर खोर्‍यात इंटरनेटसह मोबाईल, लॅण्डलाइन फोन बंद ठेवण्यात आले. सरकारच्या या निर्णयाने हत्या टळल्या, असा दावा मलिक यांनी केला. इंटरनेट, मोबाईल बंद ठेवल्यामुळे प्राण वाचले मग नुकसान काय झाले, असा सवालही त्यांनी केला. कश्मीरमध्ये यापूर्वी ज्या ज्या वेळी तणाव निर्माण झाला त्यावेळी एका आठवड्यातच किमान 50 लोकांचा बळी गेला. अशा प्रकारची जीवितहानी टाळली पाहिजे, हीच आमची सद्भावना आहे, असे स्पष्ट करतानाच मलिक यांनीदस दिन टेलिफोन नही होंगे, नही होंगे, लेकिन हम बहुत जल्दी सब वापस कर देंगे’, असे आश्वासनही नागरिकांना दिले.

औषधे, अन्नपदार्थांचा मुळीच तुटवडा नाही

कश्मीरमध्ये औषधांबरोबरच अन्नपदार्थांची कमतरता असल्याच्या बातमीचे राज्यपालांनी खंडन केले. राज्यात औषधे असो वा अन्नपदार्थ, कशाचाही तुटवडा नाही. किंबहुना ईदला आम्ही नागरिकांना मटण, भाज्या आणि अंडी पुरवली, असे मलिक म्हणाले.

आता फक्त तिरंगा

जम्मूकश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर सर्व सरकारी कार्यालयांतील जम्मूकश्मीरचा झेंडाही इतिहासजमा करण्यात आला. आता तेथे फक्त आणि फक्त हिंदुस्थानचा तिरंगाच फडकेल असे सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले.

राष्ट्रवादाच्या नावाखाली कश्मीरची गळचेपी

कश्मीरमध्ये घालण्यात आलेले निर्बंध म्हणजे राष्ट्रवादाच्या नावाखाली कश्मीरची गळचेपी असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. प्रियंका म्हणाल्या, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली कश्मीरची गळचेपी हीच मुळी भाजपचे राजकारण आणि राष्ट्रवादाविरोधातील भूमिका आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या