बॅलेट पेपर इतिहास झाला, निवडणूक ईव्हीएमवरच होणार!

‘ईव्हीएम’ नको, बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्या ही विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने साफ फेटाळून लावली आहे. बॅलेट पेपर इतिहासजमा झाला असून आगामी  विधानसभा निवडणूक ही ईव्हीएमवरच घेतली जाईल, असे ठाम प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज केले.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक ईव्हीएमवरच होईल हे सांगतानाच या मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, ईव्हीएममध्ये बिघाड होऊ शकतो, पण त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड होणे शक्यच नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा निर्वाळा दिला असल्यामुळे ईव्हीएमवर कोणत्याही प्रकारे संशय घेताच येत नाही. ईव्हीएम परिपूर्ण आहे. त्यामुळे आता मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

दिवाळी सणाचा विचार करूनच तारखा ठरवणार

निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांचे मतही विचारात घेण्यात आले. दिवाळीच्या तर अनेकांनी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या. मात्र आगामी सणांचा विचार करूनच निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखा घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

निवडणूक खर्चात सध्या तरी वाढ नाही

गेल्या दहा वर्षांत उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत कोणतीच वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईमुळे निवडणूक खर्चात वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे, तर काही पक्षांनी या खर्चात वाढ होऊ नये अशीही मागणी केली आहे. मात्र खर्चाचा निर्णय घेणे ही मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे सध्या तरी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करणे शक्य नाही, असे अरोरा यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्त भागांतील मदतकार्य सुरूच राहणार

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगली तसेच कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या मदतकार्याबाबत विचारले होते, मात्र मदतकार्यात कसलाच अडथळा येणार नाही. आचारसंहिता काळात ज्या आधीच्या तरतुदी आहेत त्यानुसार हे मदतकार्य सुरूच राहणार आहे. पण त्याही पलीकडे जाऊन जर निवडणुकीवेळी कागदपत्रांविषयीची अडचण निर्माण झाल्यास तर ती बाब विशेष म्हणून आयोगाकडून निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येणार असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले.

18 ते 35 वयोगटाच्या मतदारांवर लक्ष

मतदान अधिकाधिक वाढविण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, प्रशासन आदी विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी 5300 मतदार केंद्रांमध्ये तळमजल्यावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पडावी तसेच मतदानाची टक्केकारी जास्तीत जास्त रहावी यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचेही सुनील अरोरा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या