‘यूपी’च्या पालिका निवडणुकीत मतदार याद्या आणि ईव्हीएममध्ये गडबड!

29

सामना ऑनलाईन । लखनौ

काल निकाल जाहीर झालेल्या उत्तर प्रदेशातील पालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ आणि ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली देताना राज्याचे निवडणूक आयुक्त एस. के. अग्रवाल यांच्या संतापाचा पत्रकार परिषदेत भडकाच उडाला. जाणूनबुजून मतदारांची नावे गाळण्याचे प्रकार हे गुन्हेगारी कृत्य आहे असे सांगतानाच चौकशीचे आदेश त्यांनी दिले.

निवडणुकीतील या सावळागोंधळाबद्दल फक्त बूथ लेव्हल ऑफिसर्सनाच निलंबित करून भागणार नाही तर एडीएम, एसडीएम, तहसीलदार यांच्यासहीत डीएम (जिल्हाधिकारी) यांनाही जबाबदार धरावे लागेल, असेही निवडणूक आयुक्तांनी सांगून टाकले.

ते पुढे म्हणाले, लखनौ हे राजधानीचे शहर आहे. इथे तरी चांगल्या अधिकाऱयांची निवडणुकीसाठी नेमणूक करण्याची गरज होती, पण जिल्हा प्रशासनाने या शहरात नालायक आणि अकार्यक्षम अधिकारीच नेमल्याचे आढळले.
मतदार याद्यांतील घोळामुळे सुमारे सव्वा लाख मतदार हे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले. ज्येष्ठ भाजप नेते कलराज मिश्र, लखनौचे माजी महापौर दाऊजी गुप्ता यांच्यासारख्यांची नावेही मतदार यादीतून गायब आढळली होती.

– उत्तर प्रदेशातील निवडणुकीमध्ये फक्त ०.७ टक्के ईव्हीएम मशीन्स बदलण्यात आल्या. नियमानुसार दोन टक्के ईव्हीएम मशीन्स बदलणे सामान्य आहे.
-उत्तर प्रदेशात एकूण ३२ हजार ३७४ ईव्हीएम मशीन्स वापरण्यात आल्या. यातील फक्त ५०३ ईव्हीएम मशीन्स बदलण्यात आल्या होत्या. यापैकी निम्म्या म्हणजेच २५० ईव्हीएम मशीन्स एकटय़ा लखनौमध्ये बदलण्यात आल्या.
– जी ईव्हीएम मशीन्स बदलण्यात आली होती त्यात प्रामुख्याने तार जोडली नसल्याच्या तक्रारी होत्या.

लखनौमुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रिया अपयशी
लखनौमधील निवडणूक कर्मचाऱयांच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रियाच अपयशी ठरली अशी खंत राज्य निवडणूक आयुक्त एस. के. अग्रवाल यांनी व्यक्त केली. लखनौमधील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणच योग्यरीतीने न झाल्याने त्याचा फटका निवडणुकीच्या आयोजनाला बसला. राजधानी लखनौमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या एम-२ ईव्हीएम मशीन्स वापरण्यात आल्या होत्या तर राज्यातील इतर ठिकाणी एम-१ ईव्हीएम मशीन्सचा वापर केला तरीदेखील लखनौमधूनच ईव्हीएम मशीन्स बिघाडाच्या सर्वाधिक तक्रारी आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या