‘मेक इन इंडिया’ ला अपेक्षित यश नाही; एल अॅण्ड टीच्या चेअरमन यांनी व्यक्त केले मत

329

सध्या देशभरात रोजगारनिर्मितीची मोठी समस्या आहे. त्यात सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे मत एल अॅण्ड टीचे चेअरमन आणि नॅशनल स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचे प्रमुख ए.एम नाईक यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने उद्योगजगतातील चिंता वाढली आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ योजनेतून अपेक्षित रोजगार निर्माण झाला नाही, असेही ते म्हणाले आहेत. अनेक कंपन्या देशात वस्तू तयार करण्याऐवजी परदेशातून वस्तू आयात करण्यावर भर देत असल्याने अपेक्षित रोजगार निमिर्ती झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. एका वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून निर्यात वाढवण्याऐवजी रोजगार निर्यात करण्यात येत आहेत. परदेशातून उधारीवर माल मिळतो म्हणून अनेक कंपन्या माल आयात करतात. मात्र, देशात अशी सुविधा नसल्याने गुंतवणुकीचा प्रश्न उभा राहतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरवर्षी सुमारे एक कोटी युवक बाजारात प्रवेश करत आहेत. मात्र, त्या प्रमाणात देशात रोजगार निर्मिती होत नाही. त्यामुळे देशाच्या जीडीपीमध्येही घसरण होत आहे. आगामी काळात जीडीपीत आणखी घसरण होण्याची शक्यता नाईक यांनी व्यक्त केली. कुशल मनुष्य़बळाच्या विकासाकडे लक्ष दिले नसल्याने मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात मंदी आल्याचे त्यांनी सांगितले. आता देशाला चीनप्रमाणे जलद विकास करण्याची गरज आहे. आता आपली लोकसंख्या चीनइतकीच आहे. लोकसंख्येत आपण त्यांना मागे टाकल्यावर ही समस्या बिकट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे देशातंर्गत उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलण्यची गरज त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या