मटकाकिंग तेलनाडे बंधूविरोधात फिर्याद देणाराच ‘गोत्यात’, सुरक्षा रक्षकाने ‘गेम’ केल्याचा आरोप

3020

मोक्का अंततर्गत गुन्हा दाखल होऊन दीड वर्षे फरार असलेला आणि माजी नगरसेवक तथा कुख्यात एस.टी. गँगचा प्रमुख व मटकाकिंग संजय तेलनाडे बंधु विरोधात फिर्याद देणाराच आता गोत्यात आला आहे. भोरे यांच्या वरच कर्नाटकातून बेकायदेशीर गुटखा आणल्याप्रकरणी इंचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात निर्वस्र करुन, गुप्तांगास इलेक्ट्रीक चटके देण्यात आल्याचे आणि गुटखा प्रकरणी अंगरक्षकानेच जाणीव पूर्वक गोवल्याचा आरोप फिर्यादी नरेंद्र सुरेश भोरे याने केला आहे. तसेच पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार व संबंधित अंगरक्षक विशाल खाडे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही भोरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

जमिनी बळकावणे, खंडणी आदी गंभीर गुन्ह्यांच्या अनेक गंभीर तक्रारी आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी इचलकरंजी येथील कुख्यात एस.टी.गँगचा प्रमुख मटकाकिंग व इंचलकरंजी नगरपालिकेत तत्कालिन पाणी पुरवठा विभागाचा सभापती संजय शंकर तेलनाडेे, त्याचा भाऊ तत्कालीन नगरसेवक सुनिल तेलनाडे तसेच या टोळीचा मास्टर माईंड अँड.पवन उपाध्ये यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेली दीड वर्षे तेलनाडे बंधु फरारी असून नुुकतेच नगरपालिकेतील त्यांची पदेही अखेर रद्द करण्यात आली आहेत. त्यात खंडणीसह अन्य गुन्ह्याबाबत औषध व्यवसायिक नरेंद्र सुरेश भोरे (41, रा. फॉर्च्युनसिटी, यड्राव, ता. शिरोळ) याने जीव धोक्यात घालून तेलनाडे विरोधात फिर्याद दिली आहे. या गँगचा गुन्हेगारी क्षेत्रातील दहशत तसेच स्थानिक पोलिसांशी असलेले संबंध आणि त्यांच्या गुन्हेगारीचा रक्तरंजीत इतिहास पाहता या टोळीकडून हत्या होण्याची शक्यता असल्याने पोलीस खात्याकडून भोरे यांना गेले वर्षभर पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

अंगरक्षक पो. कॉ. विशाल खाडे यांनी इचलकरंजी येथील दत्ता दळवाई यांच्यासाठी कर्नाटकातून गुटखा आणण्यासाठी आमिष दाखविले. तसेच लाॅकडाऊनच्या काळात यातुन पैसे मिळवू, अंगरक्षक असल्याने कोणी गाडी अडविणार नसल्याचा दबाव टाकल्याने त्यांचे ऐकुन एक-दोन वेळा कर्नाटकातुन बेकायदेशीर गुटखा आणला. तेलनाडे विरोधात फिर्याद दिल्याने काही नाराज पोलीस अधिकारी कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवतील असे जाणवत होते. पण अंगरक्षक खाडे हे आमच्या गाडीतून कर्नाटकातील बोरगांव (ता.चिक्कोडी जि.बेळगांव) येथे घेऊन गेले. गाडीत गुटखा माल भरून इचलकरंजीकडे येताना पूर्वनियोजित कटाप्रमाणे त्यांनी आगोदरच इचलकरंजी पोलिसांना माहिती देऊन गुटखा जप्त करून, आपल्यासह इंचलकरंजी येथील दत्ता दळवाई, सदानंद दळवाई, गजानन दळवाई, जावेद चोकाके, मुसा जमादार व हर्षद मालगावे यांच्यावर 18 मे रोजी गुटखा तस्करीसह साथीचे रोग आदी गुन्हे नोंद करण्यात आल्याचे भोरे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

अटक व वैद्यकीय तपासणी करून इचलकरंजी (गावभाग) पोलीस ठाण्यात आणले असता,ल हजर असलेल्या पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार व एपीआय गजेन्द्र लोहार यांनी काॅ. शशीकांत डोणे व विशाल खाडे यांचे मार्फत आपल्याला निर्वस्त्र करुन पट्याने प्रचंड मारहाण केली. लोहार यांनी त्यांच्याकडील करंट बॅटरी द्वारे गुप्तांगावर करंट देऊन शारिरीक छळ केला. सुमारे तासभर मारहाण करुन,सांगेल तसेच ऐकायचे असा दम दिला. दुस-या दिवशी 19 मे रोजी सुनावणीस व्हिडीओ कॉन्फरंसद्वारेच कोर्टा समोर उभे केले. तत्पुर्वी मारहाणीची तक्रार केल्यास मारहाणीचा दुसरा राऊंड घेण्याची धमकी या अधिकाऱ्यांनी दिल्याने कोर्टासमोर भितीपोटी तक्रार करू शकलो नाही.पण सायंकाळी जामिनावर सुटका होताच प्रचंड मारहाणीमुळे आयजीएम रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शारिरीक तपासणीत मारहाण तसेच गुप्तांगाला चटकेही देण्यात आल्याचे वैद्यकीय पुरावे समोर आल्याचे ही भोरे यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान प्रत्यक्षरित्या आपला वापर करून अंगरक्षक विशाल खाडे हाच गुटखा तस्करी गुन्हेगारी करत होता. खाडेच्या आधारेच आपल्याला या गुन्ह्यात अडकवून आपले पोलीस संरक्षण काढुन घ्यायचे आणि याचा फायदा तेलनाडे गँगला करुन द्यायचे हे षडयंत्र असून त्यामुळे आता संजय तेलनाडे व त्यांच्या गँग कडुन कोणत्याही वेळी आपली हत्या होऊ शकते अशी भिंती भोरे यांनी या तक्रारीत व्यक्त केली आहे. हजेरीसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित ठाणे अमलदाराने नकार देऊन उलट दम दिला.

शिवाय अंगरक्षक खाडे याने दिलेला जबाब खोटा असून या काळातील अंगरक्षक खाडे यांच्यासह आपल्याही मोबाईलचे लोकेशन, कोणा-कोणाला कधी व कुठे संपर्क करण्यात आला. यांसह इंचलकरंजी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेऊन याची सायबर विभागाकडुन संपूर्ण माहिती घ्यावी अशी मागणीही तक्रारदार भोरे याने या अर्जातुन केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या