ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कोळसे यांनी माफी मागावी

193
परभणी : ब्राह्मण समाजाच्या भावना दुखाल्याबद्दल माजी न्यायाधिश जी.बी. कोळसे पाटील यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना ब्राह्मण एकता मंचचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, अशोक नाकाडे, स्वप्नील पिंपळकर, महेश कुलकर्णी, कृष्णा कनकदंडे, गजानन खळीकर, अशोक भोगावकर, योगेश जोशी, किशोर देशपांडे आदी.

सामना प्रतिनिधी । परभणी

एका वृत्त वाहिनीवर बोलतांना माजी न्यायाधीश जी. बी. कोळसे पाटील यांनी ब्राह्मण समाजाविरोधात व हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांना उद्देशून अवमानजनक वक्तव्य केले असून त्यांनी त्याबाबत संपूर्ण ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी येथील ब्राह्मण एकता मंचच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून करण्यात आली.

गेल्या आठवड्यात एका वृत्त वाहिनीवर ‘सनातन संस्था रडारवर’ या विषयांवर सामाजिक चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माजी न्या. कोळसे, समाजसेवक कुमार सप्तर्षी, अंनिसचे प्रवत्ते मिलिंद देशमुख व हिंदू जनजागृती समितीचे सुनिल घनवट आदींचा चर्चेत सहभाग होता. या चर्चेचे सूत्रसंचलन आशिष जाधव करीत होते. मात्र कोळसे पाटील यांनी ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले असताना व त्यांबाबत घनवट यांनी आक्षेप घेतला असतानांही सूत्रसंचालक जाधव यांनी कोळसे पाटील यांचीच पाठराखण केली असा आरोप या निवेदनात केला आहे.

कोळसे पाटील यांनी जाहीरपणे घनवट यांना ‘हरामखोर’ अशी शिवराळ भाषा वापरत ‘भटांनो, तुम्ही देशाचे वाटोळे केले’ असे हिनकस वक्तव्य करून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबाबत त्यांनी समाजाची माफी मागीतली पाहिजे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनात केली आहे. शिवाय यात म्हटले आहे की, काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाला लक्ष करून वारंवार असे प्रकार करीत समाजाची ठरवून अवहेलना होत आहे. हे प्रकार थांबले नाहीत तर समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर ब्राह्मण एकता मंचचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, अशोक नाकाडे, स्वप्नील पिंपळकर, महेश कुलकर्णी, कृष्णा कनकदंडे, गजानन खळीकर, अशोक भोगावकर, योगेश जोशी, किशोर देशपांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या