रणजित चव्हाण म्हणजे चरित्र असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे गौरवोद्गार

रणजित चव्हाण म्हणजे स्वच्छ, सुसंस्कृत चरित्र असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना केली आणि या परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांनी राज्यातील 28 महापौरांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या. या संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन आपल्याला आजही मिळतेय, असे गौरवोद्गार मुंबईचे माजी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी काढले.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांचा अमृत महोत्सवी सोहळा बुधवारी संस्थेच्या अंधेरीतील मेयर हॉलमध्ये पार पडला. यावेळी संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तर त्यांच्या चाहत्यांनी चांदीचा सिंह, तलवार आणि अन्य भेटवस्तू देऊन रणजित चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संस्थेच्या देशातील 15 राज्यांमधून आणि 42 पेंद्रांमधून आलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गानेदेखील त्यांचा सत्कार केला. संस्थेचा वटवृक्ष करण्यात माझे एकटय़ाचे यश नसून संस्थेच्या सर्वांचे यात योगदान आहे, असे सत्काराला उत्तर देताना रणजित चव्हाण म्हणाले.

या सोहळय़ाला संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, विजय साने, संस्थेचे माजी महासंचालक राजीव आगरवाल, संचालक लक्ष्मणराव लटके, कार्यकारी संचालक रमेश पाटील, उपमहासंचालक रवीरंजन गुरू, संचालिका उत्कर्षा कवडी व डॉ. स्नेहा पळणीटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.