साखर कारखान्याने शेतकऱ्याचे पैसे थकवले, काँग्रेस नेत्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

31

सामना ऑनलाईन, नागपूर

एका शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या ज्वारीचे पैसे न दिल्याने माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांच्या संपत्ती जप्तीची नामुष्की ओढवली आहे. धनंजय तडकसे या शेतकऱ्याकडून २००४ साली रणजित देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या हेटी-सुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्यातील कामगारांसाठी ज्वारी खरेदी करण्यात आली होती. ज्वारी खरेदी करूनही पुसदच्या या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे ३ लाख ३६ हजार रूपये देण्यात आले नाही. यामुळे या शेतकऱ्याने कारखान्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

सावनेरच्या दिवाणी न्यायालयाने कारखान्याला थकीत रक्कम देण्याचे आदेश दिले होते, या आदेशानंतरही कारखाना प्रशासनाची मग्रुरी कायम होती. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी देशमुख यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. यानुसार गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास जप्ती पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील बंगल्यावर धडकले. सीताबर्डी पोलिसांचे पथकही सोबत होते. मात्र, कारवाईपूर्वीच देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख तेथे पोहचले. रणजित देशमुख हे अंदमानला गेले असल्याचे सांगत, त्यांनी एक लाख रुपये जमा केले तसेच उर्वरित रक्कम रणजितबाबू परतल्यावर जमा करण्याची हमी दिली. या वेळी झालेल्या तडजोडीनंतर जप्तीची कारवाई सोमवारपर्यंत टाळण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या