मिस्टर इंडिया विजेता मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, कूपर रुग्णालयात उपचार सुरू

मिस्टर इंडिया विजेता बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आज सकाळी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मनोजने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठीत त्याने साहिल खानवर मानसिक त्रास आणि सायबर बुलिंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे साहिल खानने मनोजने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मनोज पाटील हे मिस्टर इंडिया असून त्यांनी मिस्टर ऑलिंपियामध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. सोशल मीडियावर साहिल खान हा आपल्याला आणि न्यूट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्याला कंटाळून मनोजने आज पहाटे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मनोजला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मनोजने एक चिठी लिहिली. ती चिठी सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे. त्या चिठीत त्याने साहिल खानवर गंभीर आरोप केले आहे. मानसिक त्रास आणि सायबर बुलिंग केल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठीत लिहिले आहे. मी मिस्टर ऑलिंपियासाठी तयारी केली आहे.

त्या स्पर्धेत साहिल खान सहभागी होऊ इच्छितो. आपण ऑलिंपिया स्पर्धेत जाऊ नये म्हणून साहिल हा त्रास देत असल्याचे मनोजने चिठीत नमूद केले आहे. मनोजच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समजताच ओशिवरा पोलीस घटनास्थळी गेले. सध्या मनोजवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लवकरच पोलीस मनोजचा जबाब नोंद करून पुढील कारवाई करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या