मारुती महाराज साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक, माजी आमदार दिनकर माने यांचा आरोप

बेलकुंडच्या ओसाड माळरानावर नंदनवन बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याची उभारणी केलेली होती. पण काळ बदलत गेला आणि आपली सत्ताही गेली असल्याने या चालू असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाने या भागातील सभासद शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करुन आपली पोळी भाजली असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

याबाबत आधिक माहीती आशी की, बेलकुंड येथील श्री. संत मारुती महाराज साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा 29 रोजी पार पडली या सभेत शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा बुरखाच फाडला. चालू संचालक मंडळाने त्यांना बोलत असतांना गोंधळ घालून बोलण्यापासून रोखले. त्याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता पण नंतर थोड्या वेळाने माने यांनी एक नव्हे तर असे अनेक आरोप केले. त्याच संदर्भात 30 रोजी दिनकर माने यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे या संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला त्याचा पूर्ण पाढा वाचला आहे.

मी चेअरमन असतांना केवळ कारखान्यावर 10 कोटी रुपये कर्ज होते. परंतू आता या संचालक मंडळाने केवळ एकच गळीत हंगाम केला तर कारखान्यावर 40 कोटी कर्ज झालेले आहे. असे एकूण 50 कोटी रुपयाचे कर्ज साखर कारखान्यावर झालेले आहे. आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी करण्याची आपण साखर आयुक्ताकडे मागणी करणार असल्याचेही यावेळी सांगितले. आम्हाला 10 कोटी कर्ज कारखान्यवर असल्याचे कारण सांगून वाढीव कर्ज तर दिलेच नाही पण कारखान्याला कुलपे लावली मग आत्ताच यांना कसे जिल्हा बँकेने कर्ज दिले. आणि कोणत्या निकशावर दिले?

या संचालक मंडळाने खोटा साखर उतारा दाखवून शेतकऱ्यांचे टनामागे 200 रुपये लुटले आहेत. शेतकरी सभासदांची फसवणूक करण्यासाठी मोलासिसचे उत्पादन जास्त दाखवले व साखर उतारा 10.40 पेक्षा कमी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांचे टनामागे 200 रुपये एवढे नुकसान झाले आहे. हे सगळे शेतकऱ्यांचे पैसे संचालक मंडळाने हडप केलेले आहेत. या महाभागाने बँकेला वेगळे व शुगर कमीशनला वेगळे मुल्याकन दाखवलेले असल्यामुळे 2600 रुपये सभासद शेतकऱ्यांना भाव देण्याऐवजी 2300 रुपये भाव दिलेला आहे. कारखान्याचे एकुण 1400 सभासद असून केवळ 50 ते 60 सभासदांचाच ऊस कारखान्याने नेलेला आहे.

संचालक मंडळाने जे विषय कार्यक्रम पत्रिकेवर आणलेले होते. त्यावर तर चर्चा झालेलीच नाही शिवाय जे 1 ते 11 विषय आणले होते ते पूर्णपणे चूकीचे असून या संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दिनकर माने यांनी केला आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश शिंदे, महिला आघाडीच्या जयश्रीताई उटगे, शहरप्रमुख सुरेश भूरे, विनोद माने, संजय उजळंबे, सहदेव कोरपे, चंद्रकांत माने, यांच्यासह शिवसेनेचे व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी, कारखान्याचे कांही संचालकही यावेळी उपस्थीत होते.