ट्रम्प यांचा भेटवस्तू घोटाळा, मोदी आणि योगींनी दिलेल्या भेटवस्तूही ढापल्याचा आरोप

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू्ंचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विविध राष्ट्रांच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांना ज्या भेटवस्तू मिळाल्या होत्या त्यातील जवळपास 100 भेटवस्तूंचा त्यांनी खुलासाच केला नाही असा आरोप करण्यात आला आहे. या भेटवस्तूंची एकत्रित किंमत ही 2.06 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या भेटवस्तूंचा ट्रम्प यांनी खुलासा केलेला नाही त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश असल्याचं आरोप करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकी काँग्रेसच्या डेमोक्रॅटस समितीच्या अहवालात हा आरोप करण्यात आला आहे. आरोप आहे की ट्रम्प यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 100 परदेशी भेटवस्तूंचा खुलासाच केला नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास या भेटवस्तू ट्रम्प कुटुंबाने ढापल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भेटवस्तूंची किंमत ही 2 लाख 50 हजार डॉलर्स इतकी आहे.

ज्या भेटवस्तू ट्रम्प कुटुंबाने ढापल्याचा आरोप आहे, त्या भेटवस्तूंमध्ये हिंदुस्थान दौऱ्यावर आले असताना मिळालेल्या काही भेटवस्तूंचाही समावेश आहे. या दौऱ्यावर ट्रम्प यांना एकूण 17 भेटवस्तू मिळाल्या होत्या. या भेटवस्तूंची एकूण किंमत ही 47 हजार अमेरिकी डॉलर्स इतकी होती. या भेटवस्तूंमध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेली 8500 डॉलर्सची फुलदाणी, 4600 डॉलर्सचे ताजमहालाचा मॉडेल, माजी राष्ट्रीपती रामनाथ कोविंदि यांनी केलेला 6600 डॉलर्सचा गालिचा आणि पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या 1900 डॉलर्सच्या कफलिंक यांचा समावेश आहे.

”सऊदी स्वोर्ड, इंडियन ज्वेलरी अँड ए लार्जर दॅन लाइफ साल्वाडोरन पोर्ट्रेट ऑफ डोनाल्ड ट्रम्प: द ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन फेल्युअर टू डिसक्लोज मेजर फॉरेन गिफ्ट ‘ नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीच्या चौकशीमधून हे दिसून आलं आहे की राष्ट्रपती असताना ट्रम्प यांनी सरकारी अधिकाऱ्यांसमोर काही भेटवस्तूंचा खुलासा करण्यात ट्रम्प हे असमर्थ ठरले आहेत. विदेशी भेटवस्तू कायद्यानुसार राष्ट्राध्यक्षांना भेटवस्तूंचा तपशील देणं बंधनकारक असतं. चौकशी समितीचे सदस्य असलेल्या जेमी रस्किन यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी खुलासा न केलेल्या भेटवस्तू सध्या कुठे आहेत हे शोधून काढण्यासाठी समिती कटीबद्ध असेल.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान देखील भेटवस्तू प्रकरणामुळेच अडचणीत सापडले होते. पाकिस्तानी सरकारचा एक विभाग आहे ज्याला ते ‘तोशाखाना’ म्हमतात या विभागामध्ये पंतप्रधानांना मिळणाऱ्या भेटवस्तू जमा केल्या जातात. इम्रान खान हे 2018 साली पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. यानंतर त्यांना अरब देशांच्या दौऱ्यादरम्यान तिथल्या शासकांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. या भेटवस्तू इम्रान खान यांनी सरकारी विभागात जमा केल्या खऱ्या मात्र कालांतराने इम्रान खान यांनी त्याच गोष्टी स्वस्त दरात विकत घेऊन चढ्या दराने विकल्या होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे.