रायगडावरील जमिनीत गाडलेल्या 350 वास्तू बाहेर काढणार

historical-vaastu

सामना प्रतिनिधी । किल्ले रायगड

रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू असतानाच केल्या जाणाऱ्या खोदकामात जुन्या वास्तू सापडू लागल्या आहेत. काळाच्या ओघात मातीच्या ढिगाऱ्यांखाली सुमारे 350 वास्तू गाडल्या गेल्या असून रायगडाचे संवर्धन करताना या वास्तू एकामागोमाग एक बाहेर काढल्या जाणार आहेत. केंद्राकडून येणाऱ्या 606 कोटींतून गड आणि परिसराचा विकास केला जाणार असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.

राज्यातील गडकिल्ल्यांच्या विकासासाठी रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्ग परिषदेचे आयोजन केले होते. या दुर्ग परिषदेनंतर त्यांनी गडाच्या संवर्धनाविषयीची माहिती दिली. रायगडावर पाण्याचे 84 टाके आहेत. या टाक्यांमधून गाळ काढण्यात येत आहे. हत्ती तलावासह 21 टाक्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. गाळात अनेक शिवकालीन वस्तूही सापडल्या असून त्यांचे जतन करण्यात येणार आहे. हे सर्व टाके पुनरुज्जीवित झाल्यानंतर केवळ किल्ल्याच्याच नाही तर आसपासच्या गावांच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. रायगडासोबत या परिसरातील 28 गावांचाही विकास करण्यात येणार आहे. दरम्यान, रायगड विकास प्राधिकरण ट्रस्टदेखील स्थापन करण्यात येणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. किल्ल्यावर नवीन रोप वेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर आहे. शिवभक्तांना रोप वेतून येताना सवलतीच्या दरातील तिकीट मिळावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

आणखी दहा किल्ल्यांचा विकास

आता रायगडसह आणखीन 10 किल्ल्यांच्या विकासासाठी आपण केंद्र सरकारकडे 100 कोटी रुपये मागितले आहेत. सिंधुदुर्ग, पन्हाळा, शिवनेरी, देवगिरी (दौलताबाद), सोलापूर जुना किल्ला, विदर्भातील दोन किल्ल्यांचा विकास केला जाणार आहे. केंद्र यासाठी निधी देण्यास सकारात्मक असल्याची माहिती रायगड किकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.