अभिनयाचा लागला कस

आतापर्यंत वेगवेगळय़ा भूमिका साकारणारे अभिनेते अमोल बावडेकर आता ‘प्रतिशोध  झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत तृतीयपंथीय आईची भूमिका करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद…

तुमच्या नव्या भूमिकेबाबत काय सांगाल?

– सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध  झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत एका आईची आणि मुलीची गोष्ट आहे, पण यातली आई ही स्त्र्ााr नसून ती तृतीयपंथीय आहे. त्या तृतीयपंथीय आईची भूमिका मी करतोय. माझ्या या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर या तृतीयपंथीय आईचा एक भूतकाळ आहे. तो लोकांसमोर येऊ नये यासाठी तिची सतत धडपड आहे. आपला हा भूतकाळ येऊ नये यासाठी ती धडपडते आहे. असा माझ्या या व्यक्तिरेखेचा एकंदर प्रवास आहे…

दिशा आणि ममता यांचे एकमेकांसोबत बॉण्डिंग कसे होते?

– आई आणि मुलीचं नातं खूप हळवं असतं. असं म्हणतात की, लहान बाळाला पहिलं पाऊल टाकण्यासाठी आईची गरज भासते, पण इथे मात्र आई तृतीयपंथीय असल्यामुळे लोकांसमोर यायला घाबरते. आईने पहिले पाऊल बाहेर टाकावे यासाठी तिची मुलगी म्हणजे दिशा तिचा हात घट्ट धरून तिला मदत करतेय.  आई व मुलीचे नाते इतके घट्ट आहे की, एकमेकांशी संवाद साधताना त्यांना बरेचदा शब्दांची गरज भासतेच असे नाही. काहीही न
बोलता त्या एकमेकाना समजून घेतात.

भूमिकेसाठी कशी तयारी केली?

– तृतीयपंथीय आईची भूमिका करताना मला बरीच तयारी करावी लागली. मानसिकरीत्याही मोठी तयारी करावी लागली. याआधी मी रंगभूमीवर नाटकांमध्ये स्त्री भूमिका केलेली आहे. त्यामुळे एकदा ती वेशभूषा व मेकअप झाल्यानंतर स्त्री वेशात कसे बोलायचे, हातवारे कसे करायचे वगैरे हे साधारण मला माहीत होते.स्त्री वेशभूषा केल्यावर आमचा आवाजही स्त्रीसारखाच मृदू होतो, पण येथे ते न करता पुरुषी आवाज ठेवूनच बाकीच्या लकबी, हावभाव, उभे राहण्याची, चालण्याची पद्धत हे सगळे स्त्रीसारखे ठेवायचे हे दोन्हीचे मिश्रण म्हणजे तारेवरची कसरतच होती. गंमत म्हणजे शूटच्या मधल्या काळात सगळे जण मला ‘मॅडम’ संबोधतात, त्याचीही मजा वाटते.

थरारक मालिका करण्याचा अनुभव कसा आहे?

 थरारक मालिका मी पहिल्यांदाच करतोय. काही वेळा असं होतं की, ममताचा भूतकाळ उलगडणार असे काही प्रसंग माझ्यासमोर
लिहून येतात.  त्याचे वाचन करतानाच त्यातील थरार आम्हाला जाणवतो.
आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांनाही तोच अनुभव येईल.