मोकळय़ा हवेत व्यायाम

57

संग्राम चौगुले

Anywhere can be a gym… अगदी खरं आहे… एका छोटय़ाशा युनिटच्या सहाय्याने संपूर्ण जीमचा व्यायाम आपण करू शकतो…

मुलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायला साथ द्यायची की आपली स्वप्नं त्यांच्यावर लादायची…? तुम्ही ठरवा…

जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा म्हणजे प्रचंड खर्च… ते श्रीमंतांचं काम… असा एक सर्वसाधारण मतप्रवाह आहे. पण आऊटडोअर जिम हा आपले आरोग्य फीट ठेवण्याचा एक बिनखर्चाचा उपाय म्हणता येईल. दमडीही खर्च न करता फिटनेस राखायचा तर आऊटडोअर जिममध्ये स्नायूंसाठी व्यायाम करता येईल.उघडय़ा मैदानावर व्यायाम करताना पुलअप्स बार, पुशअप्स बार, स्ट्रेचिंग स्टॅण्ड किंवा स्ट्रटिक मशीन या उपकरणांचा वापर करून शरीर फिट ठेवता येते. या उपकरणांनी आपले सगळे स्नायूंना चांगला व्यायाम होतो.

आऊटडोअर जिम्स साधारणपणे समुद्रकिनाऱयाच्या बाजूला किंवा एखाद्या मोठय़ा बागेत असतात. त्यामुळे या व्यायामप्रकाराची सुरुवात प्रामुख्याने जॉगिंगने होते. जॉगिंगमध्ये आपल्या पायांना आणि त्याबरोबरच हृदयाचाही चांगला व्यायाम होतो. मग स्ट्रेचिंग स्टॅण्डवर बेसिक स्ट्रेचेस आणि त्यानंतर पुशअप्स सुरू होतात. पुशअप्समध्ये छाती, खांते आणि ट्रायसेप या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यानंतर पुलअप्समध्ये पाठ आणि बायसेपचा व्यायाम होतो. पण हे दोन्ही व्यायाम वॉर्मअप म्हणूनच केले जातात. त्यानंतर जे पुशअप्स स्टॅण्ड असतात त्यावर ट्रायसेप जिप्स करता येतात. त्यामध्ये ट्रायसेप आणि खांद्याचा व्यायाम होतो. अशा प्रकारे आऊटडोअर जिमचा वापर करून आपण स्नायूंना व्यायाम देऊ शकतो. आऊटडोअर जिमचा व्यायाम आपण फक्त फिटनेससाठीच करू शकतो. मात्र त्याद्वारे आपण कुठल्याही व्यावसायिक खेळाचा सराव करू शकत नाही. उदाहरणच घ्यायचे तर आऊटडोअर जिममध्ये आपण बॉडीबिल्डींगचे व्यायाम करू शकतो, पण बॉडीबिल्डर बनू शकत नाही. कारण आऊटडोअर जिममध्ये आपण स्नायूंना व्यायाम देऊ शकतो, पण ते विकसित करू शकत नाही.

सार्वजनिक ठिकाणी जिम

शासनाकडून अलिकडे आऊटडोअर जिम सुरू केल्या जातात. मोठय़ा शहरांमध्ये ओपन जिमच्या सुविधा दिल्या जातात. यातून लोक वेळात वेळ काढून स्वतःला फिट ठेवू शकता. सार्वजनिक बागांमध्ये आऊटडोअर जिम उघडल्या जातात. कोणत्याही वातावरणात खुल्या ठिकाणी व्यायाम करता येतो. यामुळे खेळासारखा खेळही होतो आणि शरीराला चांगला व्यायामही होतो. अशा प्रकारचे आऊटडोअर जिम सर्वप्रथम यूएसए आणि युरोपमध्ये सुरू करण्यात आले. सध्या तरी चीनमध्ये असे ओपन जिम जास्तीतजास्त वापरले जातात. त्यांच्याकडे तर फिटनेस हा राष्ट्रीय प्रश्न असल्याने तेथे अशा प्रकारच्या जिम जास्त आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या