तुमची मुले लवकर मरणार असं सांगून महिलेला 20 लाखांचा गंडा

567

ओळख वाढवून घर भाडे तत्वावर घेण्याचे सांगत एका बंटी आणि बबली ने ज्येष्ठ महिलेला घाबरवून तुमच्या घरात भूत असून तुमची मुले लवकर मरणार असल्याचे सांगून तब्बल 20 लाख 90 हजारांना गंडा घातला आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कर्वेनगर मध्ये घडली आहे.

वेदिका नीलेश कामत उर्फ नेहा निलेश पै आणि वीर (पूर्ण नाव माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुष्कर शरद रानडे(वय-45 वर्ष, रा.कर्वेनगर, सध्या रा.अमेरिका) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्कर हे नोकरीनिमित्त अमेरिकेत राहायला असून त्यांची आई एकटीच कर्वेनगर मधील एका सोसायटीतील फ्लॅट मध्ये राहते. सप्टेंबर महिन्यात पुष्कर यांची आई भांडारकर रस्त्यावरील स्वेट्स दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी वेदिकाशी त्यांची ओळख झाली. यावेळी त्यांनी वेदिकाला घरी येण्याचे निमंत्रण दिले. 11 सप्टेंबरला वेदिका तिचा प्रियकर वीर याच्यासह पुष्कर यांची आई राहत असलेल्या कर्वेनगरमधील फ्लॅटवर गेली. दोघांनी पुष्कर यांच्या आईशी गप्पा मारल्या. त्यांच्याकडे 28 लाखांच्या फिक्स डिपॉझिटची पावती असल्याची माहिती वेदिका आणि वीरला मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी वेदिका आणि वीर पुन्हा महिलेच्या घरी गेले दोघांनी महिलेशी गोड बोलून 28 लाखांची फिक्स डिपॉझिटची पावती बँकेत गहाण ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर गहाण ठेवलेल्या फिक्स डिपॉझिटवर या दोघांनी धनादेशाद्वारे टप्प्याटप्प्याने 18 लाख रुपये काढून घेतले. वेदिका आणि वीरने त्यांचे घर भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली. त्यानंतर तुमच्या घरात भुतांचा वावर आहे, तुमची मुले लवकर मरणार आहेत असं सांगत पुष्कर यांच्या आईला तब्बल 20 लाख 90 हजारांची फसवणूक केली. पुष्कर अमेरिकेतून त्यांनी आल्यानंतर वेदिका आणि वीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस तपास करत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या