महागडी गाडी विकून त्याने 250 कुटुंबांना पुरवले मोफत ऑक्सिजन सिलिंडर

2250

आयुष्यात एकदातरी मनासारखी गाडी घेता यावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी जीवतोड मेहनत करायचीही त्यांची तयारी असते. पण, या कोरोनाच्या काळात एका तरुणाने गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी हौसेने घेतलेली महागडी गाडी विकली आहे. शहानवाझ शेख असं या तरुणाचं नाव आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मालाडचा रहिवासी असलेल्या शहानवाझने 2011मध्ये फोर्ड एन्डेव्हर ही महागडी गाडी विकत घेतली होती. आवडती नंबरची प्लेट, म्युझिक सिस्टिम असा सगळा जामानिमाही त्याने त्यासोबत घेतला होता. लॉकडाऊन काळात त्याने लोकांना त्याची गाडी रुग्णवाहिकेसारखी वापरायला मदतही केली होती. मात्र, त्याच्या व्यावसायिक भागीदाराच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यू झाला आणि तो हेलावून गेला.

त्याच्या भागीदाराची पत्नी सहा महिन्यांची गर्भवती होती. तिला 28 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र, तिला दाखल करून घेण्यास तब्बल पाच रुग्णालयांनी नकार दिला आणि सहाव्या रुग्णालयाच्या दिशेने जात असताना वाटेत रिक्षामध्येच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्युची हकिगत ऐकून शहानवाझ हेलावला. त्याने काही डॉक्टरांशी संपर्क साधून असं का झालं असावं, याचं कारण विचारलं. तेव्हा जर वेळीच तिला ऑक्सिजनचा पुरवठा झाला असता, तर ती वाचली असती, असं अनेक डॉक्टरांनी त्याला सांगितलं.

ते ऐकल्यानंतर या तरुणाने गरजूंना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्याचं निश्चित केलं. एका मित्राच्या माध्यमातून असे सिलिंडर बनवणाऱ्या कंपनीमालकाशीच थेट संपर्क साधला आणि त्यांना ऑर्डर दिली. या सिलिंडर खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने त्याची गाडी देखील विकली. त्यातून आलेल्या पैशांमधून त्याने गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर मोफत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला.

सध्या 250 कुटुंबांना त्याने ऑक्सिजन सिलिंडर पुरवले आहेत. या कामी डॉ. सबाउद्दीन शेख त्याची मदत करत आहेत. शहानवाझ याच्या म्हणण्यानुसार, मला गाडी विकल्याचं जराही दुःख झालं नाही. एखाद्या जिवाची किंमत याहूनही खूप जास्त असते. मी वैद्यकीय क्षेत्राला समांतर अशी व्यवस्था सुरू करत असल्याचा दावा करत नाही. पण, जी व्यक्ती गरजू आहे, तिला थोडी फार मदत करावी असं मला मनापासून वाटलं म्हणून मी माझी गाडी विकली, असं शहानवाझ याचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या