आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नामुळे मृत कामगाराच्या कुटुंबियांना भरघोस मदत व नोकरी

22

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यात केंद्र सरकारचा विकसनशील असा गॅस भरणा प्रकल्प बिपीसीएल मागील कित्येक वर्षांपासून कार्यान्वित असून,या प्रकल्पात प्रकल्पग्रस्त म्हणून कार्यरत असलेल्या दयानंद नामदेव ठाकूर या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून,त्याच्या भेंडखळ येथील कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

केंद्र सरकारला दरमहा कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून देणारा विकसनशील प्रकल्प म्हणून बिपीसीएल या कंपनीची ख्याती आहे.मात्र अतिशय ज्वलनशील प्रकल्प असतांना देखील या कंपनी क्षेत्रामध्ये सुरक्षेचे कोणत्याही प्रकारच्या सुविधेचा व्यवस्था नसल्याने या कामगाराचा मृत्यू झाला.

अग्निशमन व रुग्णवाहिकेची अत्यावश्यक असलेली सुविधा मागील कित्येक वर्षांपासून नसल्याचा नाकर्तेपणा या बिपीसीएल प्रशासनाने राजरोसपणे चालविला असून कामावर असलेला कामगार मृत्यूशी झुंज देत असतांना रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा अंत झाला. हा नाकर्तेपणा एका सामान्य कामगारांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याने कामगारांकडून व सामान्य नागरिकांकडून या प्रशासनाचे धिंदोडे वेशीवर टांगले आहेत. गेंड्याच्या कातडीच्या या बिपीसीएल प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांचा मृत्यू झाल्याबाबत न घेतलेल्या दखलीमुळे आज बिपीसीएल प्रकल्प बंद ठेऊन कामगारांनी निषेध नोंदवला.प्रकल्पाचे कामकाज बंद ठेऊन बिपीसीएल

कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव पिल्ले आणि त्यांच्या इतर अधिकाऱ्यांना आमदार भोईर व भेंडखळ येथील गावकऱ्यांनी धारेवर धरताच, कामावर असतांना मृत्यू पावलेल्या दयानंद नामदेव ठाकूर यांच्या वारसाला 1 कोटी 3 लाख पीएफ व ग्रॅच्युएटी देण्यात येणार असून मुलाला केंद्रातील बोर्डात प्रस्ताव पाठवून कामावर घेण्याचे लेखी आश्वासन या बिपीसीएल प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यानंतर प्रकल्पाचे कामकाज सुरळीत करण्यात आले. या तातडीच्या व महत्वपूर्ण बैठकीसाठी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या समवेत बिपीसीएल कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव पिल्ले, सिनिअर मॅनेजर मानसी दुबे, मॅनेजर संतोष जैन, बिपीसीएलचे मुंबई कार्यालयातील विलासराव पंढरावे, उरण पंचायत समितीचे सदस्य हिराजी घरत, कामगार नेते प्रकाश घरत, कैलास भोईर आणि भेंडखळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या