गाडीतून एकटेच जात असाल तर मास्क घालण्याची गरज आहे का ? आरोग्य विभागाने दिले उत्तर

तुम्ही प्रवासाला निघालाय, गाडी स्वत: चालवणार असाल आणि तुमच्याशिवाय जर गाडीत कोणी नसेल तर मास्क घालावा लागेल का ? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. याचं उत्तर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेलं आहे. जॉगिंग, सायकलिंग करणाऱ्या व्यक्तींनीही मास्क घालावा अथवा घालू नये याबाबतचे उत्तर आरोग्य विभागाने दिले आहे. विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

गुरुवारी भूषण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये काही पत्रकारांनी त्यांना विचारले की गाडीतून एकच माणूस म्हणजे स्वत: गाडी चालवणारा जात असेल आणि त्याने मास्क घातला नसेल तर त्याला पोलीस अडवतातत आणि त्याच्याकडून दंड वसूल करतात. एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मास्क गरजेचा आहे का ? यावर बोलताना भूषण यांनी सांगितले की गाडीतून एकट्यानेच प्रवास करणाऱ्या व्यक्तीला गाडीत असताना मास्क लावण्याची गरज नाहीये. गाडीत असताना मास्क लावावा अथवा नाही याबाबत कोणतेही नियम कोरोनासंदर्भातील सूचनावलीमध्ये दिलेले नसल्याचं भूषण यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये गाडीमध्ये एक माणूस असो किंवा जास्त मास्क अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नियम मोडणाऱ्यांकडून तिथे दंड वसूल केला जात आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी मास्कशिवाय गाडी चालवणाऱ्या 1200 लोकांविरुद्ध कारवाई केली होती. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींबाबत बोलताना भूषण म्हणाले की ती व्यक्ती एकटी असेल तर तिला मास्क घालण्याची गरज नाही. मात्र गटागटांनी व्यायामाला जाणाऱ्या किंवा गर्दीच्या ठिकाणी व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना मास्कची आवश्यकता आहे. मास्क घालण्यासोबतच गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज असल्याचेही भूषण म्हणाले. एकट्याने सायकलिंग करणाऱ्यांनाही मास्कची गरज नाही असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या